वरोरा येथे सुरू होणार कापूस पीक संशोधन केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:28 AM2021-07-31T04:28:20+5:302021-07-31T04:28:20+5:30
वरोरा : विदर्भात हवामान आणि मातीचा पोत लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर शेतकरी कापूस पिकाची लागवड करतात. विदर्भातील पांढरे सोने ...
वरोरा : विदर्भात हवामान आणि मातीचा पोत लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर शेतकरी कापूस पिकाची लागवड करतात. विदर्भातील पांढरे सोने म्हणून प्रसिद्ध असलेला कापूस हा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे. या कापसाची प्रत अधिक सुधारावी याकरिता वरोरा शहरातील एकर्जुना कृषी संशोधन केंद्र येथे साधारणपणे तीन कोटी रुपये खर्चून सेंटर फॉर एक्सलन्स सुरू केले जाणार आहे.
विदर्भातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस पिकाची लागवड करीत असतात. या कापसाचे उत्पन्न अधिक मिळावे, याकरिता नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना अवगत होणे गरजेचे आहे. यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, महाराष्ट्र शासन आणि इंडो काउंट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्यात नुकताच एक करार झाला असून, एकार्जुना येथे कापूस पिकासाठी सेंटर फॉर एक्सलन्स यशोधन केंद्र केले जाणार आहे. या संशोधन केंद्रामुळे शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती, सेंद्रिय पद्धतीने कापूस पिकवून उत्पन्नात वाढ करणे, मातीची प्रत तपासणे व त्यानुसार बियाणांची निवड करणे, आदी गोष्टींचे प्रशिक्षण आणि संशोधन या केंद्रात केले जाणार आहे. विदर्भातील शेतकऱ्यांसाठी हे संशोधन केंद्र वरदान ठरणार असून, नजीकच्या काळात बळिराजाला कापूस पिकापासून चांगले उत्पन्न मिळण्यास मदत होणार आहे.
यासंदर्भात पारस ॲग्रोचे संचालक अमोल मुथा म्हणाले की, या संशोधन केंद्रामुळे कापूस पिकावरील वेगवेगळ्या किडींचे नियंत्रण केले जाईल. मातीचे परीक्षण करून त्यात कोणत्या बियाणांची निवड करावी तसेच फवारणी आणि चांगल्या उत्पन्नासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण मिळेल आणि उत्पन्नात वाढही होईल.
300721\img_20210728_111953.jpg
warora