कापूस वेचणाऱ्या महिलेचा वाघाने घेतला घास; यावर्षीचा चंद्रपूर जिल्ह्यातील ४१ वा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2022 03:42 PM2022-11-16T15:42:00+5:302022-11-16T15:44:22+5:30
वाघाने अचानक हल्ला करीत जवळपास शंभर मीटर अंतरावर फरफटत नेले
मूल (चंद्रपूर) : शेतात कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. ही घटना मूल तालुक्यातील कांतापेठ येथे मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. कल्पना अरुण लोनबले (४५, रा. कांतापेठ) असे मृत महिलेचे नाव आहे. चंद्रपूर जिल्ह्यात या वर्षी वाघाने घेतलेला हा ४१ वा बळी आहे.
कल्पना लोनबले ही महिला सकाळी शेतामध्ये कापूस वेचत असताना शेताजवळ दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर अचानक हल्ला करीत जवळपास शंभर मीटर अंतरावर फरफटत नेले. वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक ५२३ मध्ये घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच वनविकास महामंडळाचे क्षेत्र सहायक राकेश कुमरे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
महिनाभरापूर्वी याच तालुक्यातील चिरोली व चिचाळा येथील दोघांना वाघाने हल्ला करून जागीच ठार केले होते. कांतापेठ येथील ताज्या घटनेने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतीची कामे कशी करायची, असा प्रश्न पडला आहे. वाघाचा तत्काळ बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे.