मजुरांअभावी शेत झाले कापसाचे पांढरे रान
By admin | Published: January 18, 2017 12:39 AM2017-01-18T00:39:19+5:302017-01-18T00:39:19+5:30
कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतात कापूस फुटून आहे.
लाख मोलाचा कापूस शेतात फुटून : कापूस वेचणीसाठी मजूर मिळेना
गोवरी : कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतात कापूस फुटून आहे. लाखमोलाचा कापूस शेतात असल्याने शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका पुन्हा चुकायला लागला आहे. कापूस वेचणीसाठी शेतकऱ्यांना मजुरांचा शोध घ्यावा लागत असल्याने, मजुरांअभावी शेत कापसाचे पांढरे रान झाले आहे.
विदर्भ प्रांतात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. चंद्रपूर जिल्हा कापूस उत्पादनात अग्रेसर मानला जातो. कापूस हे शेतकऱ्यांचे नगदी पीक असल्याने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शेतकऱ्यांनी कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. कापूस वेचणीसाठी यंदा पाहिजे तशी लगभग नसल्याने परप्रांतीय मजूर यावर्षी कापूस वेचणीसाठी आले नाही. काही शेतकऱ्यांनी घरातील सदस्यांना घेऊन कापसाची वेचणी केली. उन्हं वाढायला लागल्याने बहुतांश सर्वच शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस फुटला आहे. एकाच वेळी सर्वच शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस फुटल्याने, होते तेही मजूर कापूस वेचणीच्या कामाला लागले आहे. त्यामुळे कापूस वेचणीसाठी मजुरांचा तुटवडा निर्माण झाल्याने आता शेतकऱ्यांना मजुरांच्या शोधात फिरावे लागत आहे.
यावर्षी कापसाला बऱ्यापैकी भाव आहे. खासगी व्यापारी ५ हजार ३०० ते ४०० रुपये प्रमाणे कापसाची खरेदी करीत आहेत. तर काही शेतकऱ्यांच्या भोळेपणाचा फायदा घेत व्यापारी शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात कापसाची अक्षरश: लूट करीत असल्याचे चित्र आहे. खासगी व्यापारी मिळेल त्या पडक्या भावाने कापसाची खरेदी करीत आहेत. शेतकऱ्यांना नेहमीच अस्मानी-सुल्तानी संकटाचा सामना करावा लागला आहे. त्यात शेतकरी आजवर भरडला गेला आहे. कर्जाचा भार घेऊन शेतकरी जगत असून कर्जाच्या ओझ्याखाली अजुनही दबला आहे.
शेतकऱ्यांचे अच्छे दिन येऊन शेतकऱ्यांना सुखाचे चार क्षण अनुभवता येईल, असे वाटले होते. परंतु शेतकऱ्यांचे हे स्वप्नच आता धूसर झाले आहे. कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने बहुतांश शेतात कापूस फुटला आहे. कापूस वेचणीसाठी रेलचेल वाढल्याने शेतकरी कापूस वेचणाऱ्या मजुरांच्या शोधात लागले आहे. लाखमोलाचा कापूस शेतात फुटून असल्याने शेतकऱ्यांची धडधड वाढली आहे. (वार्ताहर)
विद्यार्थीही लागले
कापूस वेचणीच्या कामाला
एकाच वेळी बहुतांश सर्वच शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस फुटला आहे. कापूस वेचणीला सध्या मजूर मिळत नसल्याने शाळेत शिकणारी लहान मुलेही आपल्या कष्टकरी बापाला कापूस वेचणीच्या कामात मदत करीत आहे. हे धकधकते वास्तव शेतकऱ्यांचा काहीसा अंत पाहण्यासारखे आहे.