यादीत नसलेल्या कापूस बियाणांचाही जिल्ह्यात सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 10:50 PM2018-06-19T22:50:10+5:302018-06-19T22:50:47+5:30
गतवर्षी बोंडअळीने कपासीचे प्रचंड नुकसान झाले. त्यासाठी चोर बीटी बियाणे कारणीभूत ठरले होते. मागील खरीप हंगामात नुकसानीची तीव्रता पाहून कृषी विभागाने चोर बीटीला आळा घालण्यासाठी अनेक ठिकाणी छापा मारले. तरीही राज्य सरकारने अधिकृत केलेल्या ३७० वाणांच्या यादीत नसलेल्या कापूस बियाणांचा जिल्ह्यात सुळसुळाट आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गतवर्षी बोंडअळीने कपासीचे प्रचंड नुकसान झाले. त्यासाठी चोर बीटी बियाणे कारणीभूत ठरले होते. मागील खरीप हंगामात नुकसानीची तीव्रता पाहून कृषी विभागाने चोर बीटीला आळा घालण्यासाठी अनेक ठिकाणी छापा मारले. तरीही राज्य सरकारने अधिकृत केलेल्या ३७० वाणांच्या यादीत नसलेल्या कापूस बियाणांचा जिल्ह्यात सुळसुळाट आहे. यामध्ये गुजरातमधून आलेले बियाणेही माथी मारले जात आहे. यावर आळा घातला नाही, तर या हंगामात मोठे नुकसान होण्याचा धोका आहे.
यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन लागवड क्षेत्र वाढणार आहेत. मागील वर्षी बोंडअळीने हैदोस घातल्याने शेकडो शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. लागवडीचा खर्चदेखील निघाला नाही. वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, राजुरा, कोरपना या पाच तालुक्यांमध्ये शेतकºयांचे सर्वाधिक नुकसान झाले. त्यामुळे हंगाम सुरु होण्यापूर्वीच कृषी विभागाच्या बियाणे गुणवत्ता तपासणी पथकाने अनेक ठिकाणी छापे मारुन बियाणे जप्त केले. अवैध विके्रत्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. परंतु गुजरातमधून आलेले कापूस बियाणे कृषी विभागाला जप्त करण्यास अद्याप यश आले नाही. कृषी निविष्ठा विकणाºया काही दुकानदारांनी गुजरातेतील व्यापाºयांशी संगणमत करुन हे बियाणे जिल्ह्यात आणले. एजंटाच्या माध्यमातून शेतकºयांना गाठून माथी मारल्या जात आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील सोनापूर व पोडसा परिसरातील काही शेतकºयांनी एजंटमार्फत हे बियाणे विकत घेतले होते. मात्र पिकांचे नुकसान होणार अशी माहिती मिळताच त्यांनी बियाणे परत केले. दरम्यान त्या एजंटानी या शेतकºयांचे काही पैसे कपात केल्याचाही प्रकार घडला. पण, पोलीस अथवा कृषी विभागापर्यंत या घटनेची तक्रार करण्यात आली नाही. याचा अर्थ जिल्ह्यातील कापूस उत्पादक तालुक्यामधून जाळे पसरवून शेतकºयांना बोगस बियाणे विकले जात आहे. सध्या पेरणीकरिता पूरक पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहे. काही शेतकºयांनी धोका पत्करून पेरणी केली. पण, बियाणे उगवले नाही. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्यास पेरणीला वेग येऊ शकते. शेतकºयांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने बोगस बियाण्यांचे रॅकेट शोधून तातडीने बंदोबस्त करावी, अशी मागणी आहे.
बियाणे खरेदी करताना काळजी घ्या
खरेदी करावयाच्या बियाण्यांची आपल्या भागासाठी शिफारस केली आहे का हे सर्वप्रथम जाणून घ्यावे. निवडलेले वाण व कालावधीचा याची माहिती घ्यावी. आहे. वैशिष्ट कोणती, बियाण्याची खरेदी करताना कंपनीचे प्रतिनिधी किंवा विक्रेत्यांवर पूर्ण विश्वास ठेवू नये. कंपन्याच्या जाहिराती वाचून खरेदी करु नये. बियाणे अभ्यासपूर्वक खरेदी करावे. भाजीपाला बियाण्यांच्या बाबतीत हंगाम व खताच्या शिफारशी, याची माहिती घेतल्याशिवाय खरेदी करणे चुकीचे आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली. परिसरातील हवामान, पावसाचे प्रमाण तसेच कोणत्या कालावधीपर्यंत लागवड करायची याची माहिती घ्यावी. शिफारस केलेला लागवड कालावधी उलटून गेल्यानंतर बियाण्यांची लागवड करुन नये. बियाणे खरेदीच्या बिलावर पावतीवर विक्रेत्या व शेतकऱ्याची सही असणे आवश्यक आहे. बियाण्यांच्या पिशवीवरील किंमतीपेक्षा जास्त भावाने बियाणे खरेदी करु नये. पिशवीवर किंमत छापली नसल्यास किंवा आहेत त्या किंमतीपेक्षा दुकानदार जास्त पैसे मागितल्यास जिल्हा वजनमापे निरीक्षकांकडे तक्रार करावी. छापलेल्या किंमतीपेक्षा जास्त पैसे घेणे गुन्हा असून त्याविषय गप्प न राहता नियमानुसार तक्रार दाखल करण्याचे कळविण्यात आले आहे.