अंनिसकडून पीडित कुटुंबाचे समुपदेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:33 AM2021-09-04T04:33:40+5:302021-09-04T04:33:40+5:30
नागभीड (चंद्रपूर): भानामतीने पैसे पळवतो, या अंधश्रद्धेतून मिंडाळा येथे अशोक कामठे या युवकाला पाण्याच्या टाकीच्या लोखंडी खांबाला बांधून मारहाण ...
नागभीड (चंद्रपूर): भानामतीने पैसे पळवतो, या अंधश्रद्धेतून मिंडाळा येथे अशोक कामठे या युवकाला पाण्याच्या टाकीच्या लोखंडी खांबाला बांधून मारहाण करण्यात आल्यानंतर अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीने मिंडाळा येथे जाऊन पीडित कुटुंबाचे समुपदेशन केले.
अशोकची आई इंदिरा (७०) आणि बहीण यशोदा (४८) यांना गावातील जमावाने झोडपून काढले. जादूटोणा, करनी, भानामतीचा आरोप या कुटुंबावर करण्यात आला. त्यामुळे हे कुटुंब अजूनही घाबरलेल्या अवस्थेत आहे. मुलगा मारहाणीनंतर जखमी अवस्थेत अजूनही गायब आहे. निराधार जीवन जगत असलेली वृद्ध इंदिरा अशोकला मारहाण झाली, त्याच पाण्याच्या टाकीजवळ चणे, फुटाणे विकायची. आता मारहाणीमुळे आणखी खचली. अशा कुटूंबाचे समुपदेशन करण्यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी नुकतीच मिंडाळा येथे भेट दिली. यावेळी नागभीड तालुका संघटक संजय घोनमोडे, तालुका सचिव यशवंत कायरकर, महिला सदस्या लीला पाथोडे यांचीही उपस्थिती होती.
ही चमू गावात पोहचल्यानंतर वृद्ध इंदिरा व यशोदा या मायलेकींची विचारपूस केली. या जगात भानामती, करनी, जादूटोणा यांचे अस्तित्व नाही. तुमच्यावर केलेले आरोप खोटे आहेत. घाबरू नका. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आपल्या पाठीशी आहे, अशाप्रकारे पीडित कुटुंबाला धीर दिला.
जखमी अवस्थेतील अशोकला शोधून त्यावर उपचार करा. मारहाणीत सहभागी असलेल्या अन्य लोकांवर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती संबंधितांकडे करणार आहे.
030921\img-20210903-wa0033.jpg
समुपदेशन करतांना हरिभाऊ पाथोडे