लग्नपत्रिकेतून 'त्यांनी' जपला ऐतिहासिक वारसा; आगळ्यावेगळ्या पत्रिकेची सोशल मीडियावर चर्चा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 05:15 PM2022-12-19T17:15:57+5:302022-12-19T17:22:12+5:30
लग्नाचे निमंत्रण आता सोशल मीडियावरूनच, घरोघरी पत्रिका देण्याची प्रथा होतेय इतिहासजमा
चंद्रपूर :लग्न सोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास क्षण असतो. लग्नाची तारीख आणि मुहूर्त ठरल्यावर सर्वात आधी तयार केली जाते ती लग्नाची पत्रिका. कुलदेवतेला निमंत्रण पत्रिका ठेवून मग इतरांना निमंत्रण देण्यास सुरुवात केली जाते; परंतु सध्याचे डिजिटल युग आणि सोशल मीडियाच्या काळामध्ये नातेवाईक, सगेसोयरे, मित्र परिवाराला लग्नसमारंभाचे आग्रहाचे निमंत्रण पत्रिका घरी नेऊन देण्याची प्रथा इतिहास जमा होत असून, आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनच लग्नाचे निमंत्रण दिले जात आहे.
सोशल मीडियावरून लग्नपत्रिका पाठविली जात असली तरी पत्रिकांमध्ये काही वेगळे करण्याचा अनेकांचा कल असतो. चंद्रपुरातील इको-प्रो या संस्थेचे सदस्य असलेल्या सुनील मिलाल यांनी चंद्रपुरातील ऐतिहासिक वारशाविषयी जनजागृती संदेश देणारी आपली लग्नपत्रिका छापली. या पत्रिकेमध्ये चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियान, किल्ल्याचे जतन, संवर्धन, गोंडकालीन किल्ल्यासंदर्भात माहिती दिली आहे. या किल्ल्याची माहिती आपल्या कुटुंबीय, नातेवाइकांना व्हावी, यासाठी ऐतिहासिक वास्तू संवर्धनाचा संदेश देणारी त्यांनी पत्रिका छापल्याचे सांगितले.
आग्रहाचे निमंत्रण
अनेक कुटुंबीय पहिली पत्रिका देवापुढे ठेवतात. यासाठी म्हणून काहीजण लग्नपत्रिका छापत आहेत. मात्र, आजही काही खास व्यक्तींना पत्रिका घरोघरी नेऊन देत आग्रहाचे निमंत्रण देत आहेत.
साधारणत: दिवाळीनंतर लग्नसराईला सुरुवात होते. मात्र, मागील दोन वर्षांमध्ये कोरोना संकटानंतर मात्र सर्वच प्रथा बदलून गेल्या आहेत. आता कोरोना निर्बंध उठल्यामुळे धूमधडाक्यात पूर्वीसारखे लग्न सोहळे पार पडत आहे. लग्न म्हटले की, वधू-वरांकडील मंडळीची दोन ते तीन महिन्यांपूर्वीपासून तयारी केली जाते. लग्नपत्रिका अनोखी असावी, असा आग्रह अनेक कुटुंबाचा असतो. आकर्षक आमंत्रण पत्रिका देण्याकडे अनेकांचा कल असतो. त्याचेही खास ट्रेड बघायला मिळते.
काळाच्या ओघात पत्रिकेचे स्वरूप बदलले आहे. लग्नाचे आमंत्रण आता सोशल मीडियावरून दिले जात आहे. यामुळे वधू-वरांच्या कुटुंबीयांचा बराच वेळ आणि त्राससुद्धा वाचत आहे. मात्र, यामुळे काही प्रमाणात प्रिंटिंग व्यवसायाला फटका बसत आहे.