चंद्रपुरातील गुंडांना बोलावून चुलत भावाच्या मुलाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 01:51 PM2024-10-15T13:51:55+5:302024-10-15T13:56:24+5:30

मूल शहरातील थरारक घटना : महिलेसह सात जणांना अटक

Cousin's son killed by calling gangsters from Chandrapur | चंद्रपुरातील गुंडांना बोलावून चुलत भावाच्या मुलाची हत्या

Cousin's son killed by calling gangsters from Chandrapur

लोकमत न्यूज नेटवर्क 
मूल :
दुचाकी बाजूला हटविण्याच्या क्षुल्लक वादातून एका महिलेने थेट चंद्रपुरातील गुंडांना बोलावून त्यांच्याकडून चुलत भावाच्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाची मृतक प्रेम कामडे हत्या केली. ही खळबळजनक घटना मूल येथील पंचशील वार्ड क्र. ७ मध्ये रविवारी (दि. १३) रात्री १० वाजता घडली. प्रेम चरण कामडे असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी सूत्रधार महिलेसह सात जणांना अटक केली. मनिषा कामडे (२९), नरेंद्र कामडे (४२, मूल), राजेश बंडू खनके (२६), सचिन बंडू खनके (२७), वैभव राजेश महागावकर (२३), कपील विजय गेडाम (२३), श्रीकांत नारायण खनके (२८) सर्व आरोपी रा. पठाणपुरा चंद्रपूर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.


शहरातील पंचशील वार्डात एकमेकांशेजारी नरेंद्र कामडे व बबन कामडे यांचे कुटुंब राहते. हे दोघेही चुलत भाऊ आहेत. सोमवारी आरोपी नरेंद्र कामडे व त्याची पत्नी मनीषा कामडे या दोघांनी रस्त्यावरील दुचाकी बाजुला करताना बबन कामडे यांच्याशी वाद घातला. या वादातून दोघांमध्ये कडाक्याच्या भांडण झाले. दरम्यान, आरोपी मनिषा हिने थेट चंद्रपुरातील गुंडांना फोन करून मूल शहरात बोलावले. त्यानंतर, रात्री १० वाजण्याच्या सुमारास चंद्रपूरच्या पठाणपुरा वार्डातील आरोपी राजेश खनके, सचिन खनके, वैभव महागावकर, कपील गेडाम, श्रीकांत खनके (२८) हे पाच जण एम.एच. ३४ ए. ए.४४२४ क्रमाकांची कार घेऊन बबन कामडे यांच्या घरी धडकले. त्यावेळी मुख्य आरोपी नरेंद्र कामडे व मनीषा कामडे या दोघांनी चुलत भाऊ बबन कामडे यांच्याशी पुन्हा वाद घातला. त्यावेळी चंद्रपुरातून आलेल्या गुंडांनी बबन कामडे यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 


दरम्यान, त्यांना वाचविण्यासाठी प्रेम कामडी हा अल्पवयीन मुलगा समोर आला असता, गुंडांनी त्याच्यावरच चाकूने वार केले. यात प्रेमचा जागीच मृत्यू झाला. वाद सोडविताना स्वप्निल सुभाष देशमुख व अविनाश चंद्रभान कामडे हे दोघे जखमी झाले. या घटनेची तक्रार बंडू परशुराम कामडे यांनी पोलिस ठाण्यात केली. त्यावरून पोलिसांनी सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता १८९ (२),१९१(२),१९१(३),१९०, १०९,६१ (२) अन्वये गुन्हा दाखल करून लगेच अटक केली. गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त करण्यात आली. 


हत्येच्या निषेधार्थ कडकडीत बंद 
क्षुल्लक वादातून चक्क चंद्रपुरातील गुंडांना बोलावून चुलत भावाच्या अल्पवयीन मुलाची हत्या घडवून आल्याने मूल शहरात आरोपीविरुद्ध प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान, व्यावसायिक, नागरिक, सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी सोमवारी (दि. १४) शहरात कडकडीत बंद पाडून हत्येचा निषेध करण्यात आला. सर्व आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली.


पोलिस अधीक्षक शहरात दाखल 
अल्पवयीन मुलाच्या हत्येनंतर नागरिकांनी कडकडीत बंद पाळल्याची माहिती मिळताच, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी आज तातडीने शहराला भेट दिली. नागरिकांशी चर्चा केली. हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्याची ग्वाही नागरिकांना दिली. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक अमितकुमार आत्राम हे करीत आहेत. बंद दरम्यान शहरात अनुचित घटना घडली नाही.


 

Web Title: Cousin's son killed by calling gangsters from Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.