भिसी येथे २० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:26 AM2021-04-15T04:26:58+5:302021-04-15T04:26:58+5:30
भिसी : चिमूर तालुक्यातील भिसी हे अपर तालुका दर्जाप्राप्त मोठे गाव आहे. भिसी गाव सध्या तालुक्यात कोरोना हॉटस्पॉट झाले ...
भिसी : चिमूर तालुक्यातील भिसी हे अपर तालुका दर्जाप्राप्त मोठे गाव आहे. भिसी गाव सध्या तालुक्यात कोरोना हॉटस्पॉट झाले असून, अनेक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यूसुद्धा झाला आहे. या पार्श्वभूमीवर आ. कीर्तीकुमार भांगडिया, चिमुरचे उपविभागीय अधिकारी प्रकाश सपकाळ यांच्या पुढाकाराने भिसी येथील श्री विठ्ठल - रुख्माई देवस्थानच्या हॉलमध्ये २० खाटांचे विलगीकरण केंद्र नुकतेच सुरू करण्यात आले आहे.
सध्या या केंद्रात १४ कोविड पॉझिटिव्ह असलेले व सौम्य लक्षणे असलेले रुग्ण भरती करण्यात आले आहेत.
भिसीच्या या विलगीकरण केंद्रात रुग्णांसाठी आ. भांगडिया यांनी २० बेड स्वतःकडून पाठविले असून, जेवणाची व्यवस्थासुद्धा केली आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना आता चिमूर किंवा अन्य ठिकाणी विलगीकरणात राहण्याची गरज उरली नाही.
यासोबतच चिमूर येथून रुग्णांच्या देखभालीसाठी व औषधोपचारासाठी एका डॉक्टरचीसुद्धा सोय करण्यात आली आहे. शिवाय भिसी आरोग्य केंद्रातील नर्स व अन्य आरोग्य कर्मचारी यांचीही सदर केंद्रात ड्युटी लावण्यात आली आहे.
एखाद्या रुग्णाची प्रकृती बिघडल्यास त्याला तत्काळ पुढील उपचारासाठी नेता यावे व रुग्णांवर २४ तास लक्ष असावे, यासाठी या केंद्रावर २४ तास तीन पाळ्यात शिक्षकांचीही ड्युटी लावण्यात आली आहे. भिसीचे मंडळ अधिकारी खानोरकर व तलाठी सलामे भिसीच्या विलगीकरण केंद्रात सगळ्या सोयी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी स्वतः मेहनत घेत आहेत; मात्र स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची खंतही दोन्ही अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.