व्यापारी असोसिएशनने उभारले कोविड केअर सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:36 AM2021-04-30T04:36:32+5:302021-04-30T04:36:32+5:30
राईसमिल असोसिएशनतर्फे १०० बेडची व्यवस्था : कोरोनाग्रस्त रुग्णासाठी मदतीचा हात मूल : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत तालुक्यातील कोरोनाग्रस्तांना ...
राईसमिल असोसिएशनतर्फे १०० बेडची व्यवस्था : कोरोनाग्रस्त रुग्णासाठी मदतीचा हात
मूल : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत तालुक्यातील कोरोनाग्रस्तांना संस्थात्मक अलगीकरणात उपचार घेणे सोयीचे व्हावे, यासाठी येथील राईस मिल असोसिएशनने कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी १०० बेडची व्यवस्था एस.एम.लॉन मध्ये करून प्रशासनाला सहकार्याचा हात दिला आहे.
त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी फार मोठा दिलासा मिळाला असून प्रशासनाचा ताणदेखील कमी झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णाची संख्या वाढत असल्याने प्रशासनावर ताण पडताना दिसत होता. रुग्णसंख्या वाढतच असल्याचे दिसून येत आहे. प्रथम उपजिल्हा रुग्णालयातील नवीन बांधलेल्या इमारतीत ७० बेडची व्यवस्था करण्यात आली. मात्र, वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नगर परिषदेने नवीन बांधलेल्या शाळेच्या इमारतीत १५० बेडची निर्मिती करण्यात आली. २२० बेडची व्यवस्था केल्यानंतरही कोरोना रुग्णाची संख्या वाढतच असल्याचे दिसून आले. त्यामुळे मूल येथील व्यापारी असोसिएशनने सामाजिक बांधिलकी जोपासत प्रथमतः ५० बेडची व्यवस्था केली. रुग्णसंख्या वाढणार असे भाकित ठरवून पुन्हा ५० बेडची व्यवस्था व्यापारी असोसिएशनने केली. एकंदरीत असोसिएशनने १०० बेडची व्यवस्था केली. यात पलंग, गादी, चादर, उशी व शासकीय रुग्णालयात बाधितांना व नातेवाईकांना बसण्यासाठी बेंचची व्यवस्था यापूर्वीच केली आहे. प्रशासनाने घेतलेल्या वाढीव खाटांच्या निर्णयाला राईस मिल असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून पुन्हा सहकार्याचा हात दिला आहे. स्थानिक चामोर्शी मार्गावरील एस.एम.लाॅन येथे निर्माण करण्यात आलेल्या या केंद्रात सोय उपलब्ध करून दिली आहे.