नवे मत्स्यधोरण तयार करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2017 12:27 AM2017-06-13T00:27:28+5:302017-06-13T00:27:28+5:30
पूर्व विदर्भात मत्स्य उद्योगाला चालना देणे शक्य असून या ठिकाणच्या नैसर्गिक मत्स्य निर्मिती प्रक्रियेला गतिशील करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल, ...
महादेव जानकर : चंद्रपूरला मत्स्यबीज निर्मितीसाठी शासन मदत करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पूर्व विदर्भात मत्स्य उद्योगाला चालना देणे शक्य असून या ठिकाणच्या नैसर्गिक मत्स्य निर्मिती प्रक्रियेला गतिशील करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यपालन मंत्री महादेव जानकर यांनी आज दिले.
चंद्रपूर जिल्ह्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर आलेले महादेव जानकर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यपालन विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. बैठकीला आमदार सुरेश धानोरकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणात तलावांची संख्या असून नद्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात मत्स्यव्यवसाय सुरु आहे. मात्र या जिल्ह्याने या व्यवसायात अधिक गती घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासन नवे मत्स्यधोरण तयार करणार असून त्यासाठी विविध प्रस्ताव व सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना मागितल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाला गती देण्यासाठी विविध योजनांना व्यक्तिगत स्तरावर वापरण्यासाठी संस्थांचे निकष शिथिल करणे, मागेल त्याला मत्स्यबीज उपलब्ध करणे, गोंदियाला मत्स्यव्यवसायाचे हब बनविणे, चंद्रपूरच्या मत्स्यविक्री बाजाराला अद्ययावत करणे आदी विविध उपाय त्यांनी सूचविले.
दूध उत्पादन वाढविण्याची सूचना
पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यात अधिक सक्रियतेने कार्य करणे आवश्यक असून या विभागातील अधिकाऱ्यांनी कल्पकतने नव्या चंद्रपूर पॅटर्नसह पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच सर्व पशुचिकित्सालय आयएसओ दजार्चे करण्याची सूचना त्यांनी केली. दुग्धव्यवसायासंदर्भातही त्यांनी जिल्ह्याच्या आलेखात वाढ करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. दूध, मास, अंडी, मासे मोठया प्रमाणात महाराष्ट्र शासनाला आयात करावे लागतात, असे त्यांनी सांगितले.