उपयोगी शोधासाठी नवीन पिढी तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 10:24 PM2018-12-01T22:24:43+5:302018-12-01T22:25:10+5:30
शिक्षण घेणे म्हणजे पुस्तकी ज्ञान लादणे नव्हे. शिक्षण म्हणजे अंतरात्म्याच्या विकासाला चालना मिळणे होय. शिक्षणातून समाजाला काहीतरी देता आले पाहिजे. शिक्षणातून नवनवीन समाज उपयोगी शोध पुढे आले पाहिजे. यासाठी नव्या पिढीला तयार करा, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. बल्लारपूर येथे साईबाबा ज्ञानपीठ कॉन्व्हेंट येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शिक्षण घेणे म्हणजे पुस्तकी ज्ञान लादणे नव्हे. शिक्षण म्हणजे अंतरात्म्याच्या विकासाला चालना मिळणे होय. शिक्षणातून समाजाला काहीतरी देता आले पाहिजे. शिक्षणातून नवनवीन समाज उपयोगी शोध पुढे आले पाहिजे. यासाठी नव्या पिढीला तयार करा, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. बल्लारपूर येथे साईबाबा ज्ञानपीठ कॉन्व्हेंट येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिश शर्मा, सभापती गोविंदा पोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, पोंभूणा पं. स. सभापती अलका आत्राम, जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार, मुख्याधिकारी बिपिन मुद्धा, गटविकास अधिकारी श्वेता यादव, प्राचार्य किरण सिंग चंदेल आदी उपस्थित होते.
तालुक्यातील सर्व शाळांचे शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जपान देशातील शिक्षण पद्धतीचा दाखला दिला. जपानमध्ये शिक्षणात प्रयोगशिलतेवर अधिक भर दिला जातो. ते म्हणाले, शिक्षण म्हणजे केवळ पुस्तक वाचणे नव्हे. शिक्षण हे जबरदस्तीने ज्ञान वाटणे किंवा घेणे नव्हे. शिक्षण म्हणजे अंतरात्म्यासोबतचा संवाद होय. अंतरात्मा विकसित करणे शिक्षणाचे प्रथम ध्येय असले पाहिजे.
विद्यार्थ्यांना न्यूटन, एडीसन यांचा जन्म कधी झाला, न्यूटन कसा दिसत होता किंवा त्यांचा मृत्यू कधी झाला, हे एकदाचे नाही शिकवले तरी चालेल. मात्र न्यूटन तुमच्या शाळेमध्ये कसा तयार होईल, तुमच्या शाळेमध्ये विद्यार्थी कसा प्रयोग करायला शिकेल, याबाबतच्या उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. बल्लारपूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेले नवनवीन प्रयोग लक्ष वेधणारे असल्याचे सांगून त्यांनी मुलांच्या वैज्ञानिक व सांस्कृतिक कलागुणांचे कौतुक केले. विज्ञान प्रदर्शनी ही दरवर्षीची खाणापूर्ती होऊ नये. विद्यार्थ्यांमध्ये शोधकवृत्ती वाढेल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित शिक्षकांना केले. कार्यक्रमाला पोंभुर्णा तालुक्यातील नागरिकही मोठ्या संख्येने होते.
पोंभुर्णा येथील एमआयडीसीला ना. मुनगंटीवार यांनी नुकतीच मंजुरी दिल्याबद्दल पोंभुर्णा तालुक्याच्या वतीने नागरिकांनी स्वागत केले. यावेळी साईबाबा ज्ञानपीठ कॉन्हेंटच्या मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. प्रास्ताविक शोभा मडावी, संचालन मुक्ता खुराना, विद्यार्थिनी साक्षी बनकर, खुशबू घोडमोरे यांनी केले.