इतिहास संशोधनातून पर्यटन रोजगार निर्माण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 10:38 PM2019-02-20T22:38:52+5:302019-02-20T22:39:11+5:30
विदर्भाची भूमी ही ऐतिहासिक वारशाने समृद्ध आहे. ऐतिहासिक वैभव हा देशाचा सांस्कृतिक ठेवा असतो. विदर्भाचा इतिहास हा प्राचीन असून वैभवशाली आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याविषयी इतिहासाच्या संशोधकांनी विविध स्थळांकडे पर्यटन विकासाच्या दृष्टीने बघावे आणि रोजगाराच्या संधी कशा निर्माण होतील, यावर वस्तुनिष्ठ संशोधन करावे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांनी ५१ व्या इतिहास परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचांदूर : विदर्भाची भूमी ही ऐतिहासिक वारशाने समृद्ध आहे. ऐतिहासिक वैभव हा देशाचा सांस्कृतिक ठेवा असतो. विदर्भाचा इतिहास हा प्राचीन असून वैभवशाली आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याविषयी इतिहासाच्या संशोधकांनी विविध स्थळांकडे पर्यटन विकासाच्या दृष्टीने बघावे आणि रोजगाराच्या संधी कशा निर्माण होतील, यावर वस्तुनिष्ठ संशोधन करावे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांनी ५१ व्या इतिहास परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी केले.
गडचांदूर येथील शरद पवार कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व गोंडवाना विद्यापीठाच्या पुढाकारात ही इतिहास परिषद पार पडली. दहशतवादी हल्ल्यातील शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले तर प्रमुख अतिथी डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, बिजभाषक डॉ. बी. आर. वाघमारे, परिषदेचे अध्यक्ष डॉ. व्ही. जी. बैस, प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह, परिषदेचे सचिव प्रा. डॉ. शरद सिंग, प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह, प्रा. डॉॅ. शरद बेलोरकर व अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.
प्राचार्य सिंह यांनी इतिहास परिषद आयोजनाची भूमिका विशद केली. डॉ. यांनी भारताच्या सांस्कृतिक विकासात इतिहासाचे योगदान कसे आहे, नव्या पिढीने यातून कोणती प्रेरणा घ्यावी, यावर भाष्य केले.
डॉ. बी. आर. वाघमारे म्हणाले, १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात आदिवासींचे मोठे योगदान आहे. त्यांचा संघर्ष हा भारताच्या इतिहासामधील अमुल्य ठेवा आहे. विदर्भाचा गतकालीन इतिहास हा आदिवासींच्या क्रांतीचा तेजस्वी वारसा असून ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आदिवासींच्या योगदानाकडे कदापि दुर्लक्ष करता येत नाही, याकडे लक्ष वेधले. अध्यक्ष डॉ. व्ही. जी. बैस म्हणाले, अहिंसेच्या लढ्याने भारताचा स्वातंत्र्य संग्राम इतिहास जगात अजरामर झाला. महात्मा गांधींचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. यावेळी इतिहास परिषदेच्या ‘ शोध निबंध (खंड १९ )’ हा संशोधक ग्रंथ तसेच डॉ. प्रफुल्ल टाले लिखित ‘महाराष्टÑातील समाज सुधारक’ पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. ‘इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा’ या गीताने अतिथींचे स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवर सत्कार करण्यात आला. संचालन प्रा. डॉ. संजय गोरे यांनी केले. परिषदेचे सचिव प्रा. डॉ. शरद बेलोरकर यांनी आभार मानले.