स्वातंत्र संग्राम सैनिकाच्या मुलावर लोकवर्गणीतून अंत्यसंस्कार
By admin | Published: January 23, 2017 12:34 AM2017-01-23T00:34:25+5:302017-01-23T00:34:25+5:30
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील माजी स्वातंत्र संग्राम सैनिक गणपत सोनटक्के यांच्या पत्नी जनाबाई हिने कुटुंबापासून हरविलेल्या एका निराधार १० वर्षाच्या मुलाचा सांभाळ केला.
विसापूरच्या सोनटक्के कुटुंबावर ओढवला प्रसंग : नागरिकांनी जोपासली सामाजिक बांधिलकी
अनेकश्वर मेश्राम बल्लारपूर
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील माजी स्वातंत्र संग्राम सैनिक गणपत सोनटक्के यांच्या पत्नी जनाबाई हिने कुटुंबापासून हरविलेल्या एका निराधार १० वर्षाच्या मुलाचा सांभाळ केला. त्याचे पालनपोषण करुन लग्नही लावून दिले. त्या मुलाचे अल्प आजाराने शनिवारी चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र हलाखीच्या परिस्थीतीमुळे त्याच्यावर लोकवर्गणीतून अंत्यसंस्कार करण्याची पाळी सोनटक्के कुटुुंबियावर ओढावली.
तालुक्यातील विसापूर येथे रविवारी हा प्रसंग घडला. दुजाराम गणपत सोनटक्के (५०) असे मृताचे नाव आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी इंग्रजी सत्तेच्या जोखंडातून भारतीयांना सोडविण्यासाठी स्वातंत्र्योपूर्वीत्तर काळात रणसिंग पुकारले होते. सन १९४२ मध्ये ‘चले जाव’चा नारा दिला होता. त्यावेळी सर्वाची देश भावना भारताला स्वातंत्र मिळावे असीच होती. महात्मा गांधी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत व देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून प्रेरित झालेले विसापूर येथील गणपत सोनटक्के यांच्यासह चार-पाच जणांनी बल्लारपूर-चंद्रपूर दरम्यान रेल्वेलाईन उखडण्याचा प्रयत्न केला. परिकीयांच्या तावडीतून देशाला मुक्त करण्याचा तो प्रसंग होता. त्यावेळी इंग्रजांनी गणपत सोनटक्के यांच्यासह चार-पाच जणांवर खटले दाखल करुन तुरुंगात डांबले होते.
अशातच विसापूर गावात नऊ-दहा वर्षाचा मुलगा रडत गावात फिरत होता. त्यावेळी गणपत सोनटक्के यांच्या पत्नी जनाबाई हिने पोटची दोन मुले असताना, निराधार अवस्थेत असलेल्या मुलला जवळ घेत त्याचे संगोपन केले. त्याला स्वत:चे नाव दिले. त्याचे लग्नही करुन दिले. त्याच्या संसारवेलीवर तीन मुली आल्या. मात्र आई जनाबाईच्या निधनानंतर त्याच्यावर आघात कोसळला. घरची परिस्थिती अत्यंत हलाकिची होती. मोलमजुरी करुन दुजाराम कुटुंबाचा गाडा ओढत होता. मात्र घरातील अठराविश्व दारिद्र्यातून मरणापर्यंत त्याची सुटका झाली नाही.
शनिवारी घरी काम करीत असताना भोवळ आली. रक्तदाब वाढल्याने मेंदूवर आघात झाला. शेजाऱ्यांनी उपचारासाठी रूग्णालयात नेले. मात्र दुजाराम यांची प्राणज्योत जिल्हा सामान्य रुग्णालयात मालवली. त्यावेळी नावाने लक्ष्मी असलेल्या पत्नीवर पैशाअभावी अंत्यसंस्कार कसा करावा, येणाऱ्या आप्तेष्टांसाची सोय कशी करावी, हा प्रश्न उभा राहिला.
त्यांनी घराशेजारी असलेल्या ग्रामपंचायत सदस्य सरिता झाडे व बुद्धीवान कांबळे यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासून जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, सरपंच रिता जिलटे, मधूकर भोयर, अशोक थेरे, राजू पुणेकर, अविनाश सोनटक्के, आर. एम. सुंदरगिरी, छत्रपती मडावी, दौलत पारशिवे, पिंटू हिकरे, सुधीर गिरडकर, सुरेश इटनकर, दिलीप टोंगे, दिलीप पाटील, सुरेश मोगरे, प्रविण गिरडकर, उत्तम गेडाम, सुरेखा इटनकर, मिना सादराणी, किशोर पंदिलवार, गजानन पानटनकर, सुनिल पुनकटवार यांच्यासह सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी सोनटक्के यांच्या मुलावर अंत्यसंस्कारासाठी लोकवर्गणी दिली. दुजाराम गणपत सोनटक्के यांच्या पश्चात पत्नी लक्ष्मी व तीन मुली असा परिवार आहे. त्यांना शासकीय मदत देण्याची मागणी होत आहे.