‘त्या’ गुन्ह्याला क्षमा नसावी
By admin | Published: October 28, 2016 12:48 AM2016-10-28T00:48:27+5:302016-10-28T00:48:27+5:30
आवळगाव येथील अल्पवयीन मुलीला शेतशिवारात जिवानीशी मारले. आरोपी राजेंद्र दयाराम शेंडे याला ब्रह्मपुरी व मेंडकी पोलिसांनी अल्पावधीत पकडले.
सामाजिक तेढीची घटना : मानवी विकृतीमुळे सामाजिक असंतोष
ब्रह्मपुरी : आवळगाव येथील अल्पवयीन मुलीला शेतशिवारात जिवानीशी मारले. आरोपी राजेंद्र दयाराम शेंडे याला ब्रह्मपुरी व मेंडकी पोलिसांनी अल्पावधीत पकडले. या नराधमाने केलेले कृत्य हे मानवी मनाला कलंकीत करणारे असून समाजात दुफळी माजविणारे आहे. अशा कौर्यकर्माला क्षमा नसावी, अशी भावना सर्वस्तरातून व्यक्त केली जात आहे.
मृत मुलीचे वय खेळण्या-बागडण्याचे होते. अकरावीत शिक्षण घेत असताना आपण काही तरी मोठे होऊन घरचे अठराविश्व द्रारिद्य कमी करावे. घराण्याचे व समाजाचे नाव मोठ करावे, असा ध्यास कदाचित असावा. पण आपल्याच नाते संबंधातील व्यक्ती असा प्रसंग आपल्यावर कधीही करणार नाही, असा विचार तिने स्वप्नातही केला नसेल.
नराधम राजेंद्र हा ३५ वर्षाचा असल्याने त्याने आपल्या परिपक्वतेच्या आधारावर पीडित मुलगी बहिणीसारखी आहे. तिच्या व आपल्या वयात दुप्पट अंतर आहे. आपल्याला पत्नी, मुलगा, आई-वडील, भाऊ असा कुटुंब आहे. त्याने या साऱ्या विवेकबुद्धीचा विचारच केला नसल्याने समाजाला, घराण्याला काळीमा फासण्याचे काम केले आहे.
मृत मुलीचे आई-वडील, लहान दोन बहिणी व त्याहून एक लहान भाऊ या सर्वाची जबाबदारी दोन- तीन वर्षानंतर तिला पेलायची होती. तो आधारच निघून गेला, याचे शल्य आईच्या डोळ्यात दिसून येत होते. पडके घर, दोन वेळेचे पुरेसे जेवन नाही. घालायला चांगले कपडे नाहीत, याचे तरी भान नराधम राजेंद्रने ठेवले नाही.
उलट, भाऊ ! जाताना मला आवाज देशील. मी तुझ्या सायकलवर येईन, असा तिने विश्वास ठेवला. पण त्याने मात्र घात केला. ही विकृती केवळ मानवी विचारातून निर्माण झाली असते. त्याला जात, समाज हा संबंध नसतो. पण नंतर मात्र हा संबंध जोडल्या जाऊन काहूर माजविले जाते. तेव्हा कायदा-सुव्यवस्था, पोषक वातावरण, सामाजिक सलोखा, असुरक्षतेची भावना न कळत जन्माला येत असते. ते समाज, जात, नेते, आणि जे-जे कोणी जाणकार आहेत, त्यांनी स्वत: समजून व व इतरांना समजवून सांगण्याची ही घटना आहे.
केलेले कृत्य हे कल्पनेच्या बाहेरचे आहे. स्कार्पने गळा आवळते. नंतर स्कार्प सोडून वाचली तर काय होईल, या भीतीपोटी तिच्याच अंगावरचे कपडे फाडून त्याच्या चिंध्या करुन दोरी तयार करणे आणि त्या दोरीने हात बांधून ठेवणे, ही ‘विनाशकालीन बुद्धी’, जसी त्याला सूचली, त्यापेक्षा हे कृत्य करण्यापूर्वी सद्बुद्धीने विचार केला असता तर या खून झालेल्या अल्पवयीन मुलीवर ही पाळी आली नसती. (तालुका प्रतिनिधी)
मानवी विकृतीची झळ समाजाला
मानवी विकृती ही मनुष्यामध्ये निर्माण होते. त्याला कोणताही समाज असे कृत्य करायला सांगत नाही. तरीही समाजा-समाजामध्ये वादळ माजविल्या जाते. हे कुठेतरी थांबले पाहिजे, असे समाजमन असलेल्या प्रत्येकाला वाटत असते. समाजा-समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घटना अशा प्रवृत्तीमधून येत असतात. पण ही प्रवृत्ती केवळ एक किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तीची स्वतंत्र राहत असते. मात्र, त्याची झळ दोन समाजातील व पर्यायाने सर्व जनतेला भोगावी लागते. ते कुठेतरी थांबण्याची व समजून घेण्याची पुरोगामी म्हणविणाऱ्यांनी समजून घेणे आवश्यक झाले आहे.