बनावट खते, बियाणेप्रकरणी चौघांवर गुन्हा; विक्रीवरही बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2021 05:00 AM2021-12-16T05:00:00+5:302021-12-16T05:00:40+5:30
बियाणे कायदा १९६६ अन्वये विक्रेत्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. अधिक सूचित म्हणून जाहीर केलेल्या जातींच्या बियाण्यांची विक्री करताना बियाणे विक्रेत्याने महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते. विक्रीसाठी ठेवलेल्या बियाण्याचे पोते, पिशवी, डबा अथवा अन्य प्रकारे बियाणे ठेवल्यास त्यावर बियाण्याचा खरा दर्जा दाखविणारे सूचीपत्र किंवा निशाणी, खूणचिठ्ठी असली पाहिजे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बनावट बियाणे, कीटकनाशक आणि खते विकल्याप्रकरणी कृषी विभागाच्या गुणनियंत्रण पथकाने वर्षभरात १३ केंद्राना विक्रीस बंदी घातली तर चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. बनावट प्रकार घडू नये, यासाठी शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
बियाणे कायदा १९६६ अन्वये विक्रेत्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. अधिक सूचित म्हणून जाहीर केलेल्या जातींच्या बियाण्यांची विक्री करताना बियाणे विक्रेत्याने महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते. विक्रीसाठी ठेवलेल्या बियाण्याचे पोते, पिशवी, डबा अथवा अन्य प्रकारे बियाणे ठेवल्यास त्यावर बियाण्याचा खरा दर्जा दाखविणारे सूचीपत्र किंवा निशाणी, खूणचिठ्ठी असली पाहिजे. या खूण चिठ्ठीवरील माहितीच्या सत्यतेबद्दलची जबाबदारी बी विक्रेत्याची राहील. बियाणे अप्रमाणित असले तरी खूणचिठ्ठी ठराविक रंगाची आणि आवश्यक नमुन्यातीलच असावी, बियाण्याच्या प्रत्येक गटाचा योग्य नमुना त्या गटातील त्या बियाण्याची संपूर्ण विक्री झाल्यानंतर एक वर्षापर्यंत ठेवणे बंधनकारक आहे. प्रत्येक बियाणे गटाचे खरेदी व विक्रीबाबतचे दप्तर विक्री संपल्यानंतर तीन वर्षांपर्यंत अद्ययावत ठेवणे आवश्यक; परंतु नियम धाब्यावर बसवून विक्री केल्याचे आढळल्याने गुणनियंत्रक पथकाने वर्षभरात दोषींवर कारवाई केेली.
नोव्हेंबर अखेरपर्यंत १३८ नमुने बनावट
जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय अंतर्गत गुणनियंत्रक पथकाने जिल्ह्यातील गोळा केलेल्या बियाणे, खते व कीटकनाशके नमुन्यांपैकी १३८ नमुने बनावट आढळली. यामध्ये सर्वाधिक खताचे नमुने आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणेही नमुने नसल्याने संबंधित विक्रेत्यांना ताकीद देण्यात आली. काहींवर कारवाई झाली.
१ हजार ४०३ नमुने गोळा
जिल्ह्यातून १ हजार ४०३ नमुने गोळा करण्यात आले. यामध्ये बियाणे ८२१, खते ४१८ आणि कीटनाशकांच्या १६४ नमुन्यांचा समावेश आहे. हे नमुने जिल्हा परिषदचे अर्धवेळ, तसेच राज्य कृषी विभागाच्या निरीक्षकांनी गोळा केले आहेत.
१ हजार १९१ नमुन्यांची तपासणी
चंद्रपूर जिल्ह्यातून गोळा केलेल्या एकूण नमुन्यांमधून १ हजार १९१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे बियाणे, खते व कीटनाशके मिळावे, यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात आले.
शेतीसाठी उत्तम दर्जाचे बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा पुरवठा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार संबंधित परवानाधारक विक्रेत्यांनी नियमांचे पालन करून पुरवठा केला पाहिजे. निकृष्ट दर्जाचे साहित्य आढळल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा. तक्रारीसाठी पुढे यावे. जिल्ह्यात भरारी पथके सज्ज आहेत.
- प्रशांत मडावी,
जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी, चंद्रपूर