पाहार्णी ग्रामपंचायतमध्ये सात लाखांचा भ्रष्टाचार
By admin | Published: April 6, 2017 12:33 AM2017-04-06T00:33:32+5:302017-04-06T00:33:32+5:30
पाहार्णी येथील ग्रामपंचायती अंतर्गत विविध कामात गैव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे.
ग्रामस्थांचा आरोप : बीडीओच्या चौकशीत सिद्ध
नागभीड : पाहार्णी येथील ग्रामपंचायती अंतर्गत विविध कामात गैव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सरपंच दोषी असल्याचे संवर्ग विकास अधिकारी यांच्या चौकशीत सिद्ध झाले असून आता सरपंच देवानंद बावणकर यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, पाहर्णी ग्रामपंचायतीच्या हद्दीत काँक्रीट रोड बनविण्यात आले. मात्र बिलाप्रमाणे साहित्य प्राप्त झाले नाही. साहित्य कमी प्राप्त होऊनही जादा साहित्याचे बिल पं.स. कार्यालयाला सादर करुन शासनाची दिशाभूल करण्यात आली आहे. सरपंचासोबत सचिवानेही कर्तव्यात कसूर केली असून कोणत्या बांधकामाला किती साहित्य याबाबत अद्यावत नोंदी सचिवाने घेतल्या नाही.
या रस्त्याचे काम थांबल्यानंतर चार लाख ९७ हजार रुपयांचे साहित्य शिल्लक असावयास पाहिजे. मात्र कोणतेही साहित्य शिल्लक आढळले नाही. ग्रामपंचायतीचा प्रकार अन्य ग्रामसेवकांकडे सोपविल्यानंतर हा साठा नव्याने रुजू झालेल्या ग्रामसेवकाकडे सोपविण्यात आला नाही. यावरुन चार लाख ८७ हजार रुपये किंमतीच्या साहित्याची अफरातफर झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या प्रकरणी सरपंच आणि सचिव यांना जबाबदार का धरण्यात येवू नये असा शेरा संवर्ग विकास अधिकारी यांनीच मारल्याने या भ्रष्टाचाराला पुष्टीच मिळाली आहे, असाही आरोपही ग्रामस्थांनी यावेळी केला. ग्रामपंचायतीने मागणी केल्यानुसार या रस्त्याच्या बांधकामासाठी दहा लाख ५१ हजार ४२३ रुपये उपलब्ध करुन देण्यात आले. मात्र साहित्य पुरवठाधारकास काहीही सबळ कारण नसताना रक्कम वितरीत करण्यात आली. यावरुन साहित्य खरेदी न करता बनावट बिलाचे आधारे शासनाकडून रकमेची मागणी केल्याचे या चौकशीत आढळून आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. एवढेच नाही तर माहिती दर्शक फलक न लावता तीन फलकांचा खर्च नमुद करुन हा खर्चही उचलण्यात आला आहे. याशिवाय अंदाजपत्रकात तरतूद नसतानाही साहित्याची खरेदी केल्याचे दर्शवून नियमबाह्य खर्च काही हजारांच्या घरात दाखविण्यात आला आहे. जवळपास सात लाख रुपयांचा हा भ्रष्टाचार आहे. या सर्व बाबी संवर्ग विकास अधिकाऱ्यांच्या चौकशीतच सिध्द झाल्यात आहेत. त्यामुळे दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. कारवाई न झाल्यास पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी किशोर निरगुडे, माजी सरपंच पुरुषोत्तम बगमारे, मंगेश मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)