बॅन्ड व्यावसायिकांवर पुन्हा संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:51 AM2021-03-04T04:51:55+5:302021-03-04T04:51:55+5:30
गोल बाजारातील अतिक्रमण हटविण्याची मागणी चंद्रपूर : येथील बाजार वार्डातील सर्वाधिक गजबजलेला परिसर गोलबाजार आहे. या ठिकाणी व्यावसायिकांची ...
गोल बाजारातील अतिक्रमण हटविण्याची मागणी
चंद्रपूर : येथील बाजार वार्डातील सर्वाधिक गजबजलेला परिसर गोलबाजार आहे. या ठिकाणी व्यावसायिकांची मोठी चाळच आहे. याशिवाय येथे दररोज भाजीबाजारही भरतो. पूर्वी गोलबाजारात गांधी चौकापर्यंत जाण्यासाठी मोठा रस्ता होता. मात्र सध्या व्यावसायिकांनी या रस्त्यावर अतिक्रमण केल्याने रस्ता अरुंद झाला आहे. या रस्त्यावरून चालतानाही त्रास सहन करावा लागत आहे. एखादा वाहनधारक बाजारातून दुचाकी चालवित असल्यामुळे विक्रेत्यांसह ग्राहकही संताप व्यक्त करीत आहे. त्यामुळे या ठिकाणचे अतिक्रमण हटवून बाजारात दुचाकी वाहनांना बंदी घालावी, अशी मागणी सामान्य नागरिकांकडून केली जात आहे.
रोहयोची कामे सुरू करण्याची मागणी
चंद्रपूर : काही गावांतील मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या संकटामुळे गावातील काही नागरिकांकडे कामच नसल्यामुळे त्यांना कुटुंबाचे पालन पोषण करताना अडचण येत आहे.
वाढत्या तापमानामुळे चंद्रपूरकर हैराण
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून चंद्रपुरातील तापमान वाढीस लागले आहे. त्यामुळे गर्मी वाढली आहे. अनेकांनी मागील काही महिन्यांपासून बंद असलेले कुलर काढून साफसफाई सुरू केली आहे. शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या घामाच्या धारा वाहू लागल्या आहे.
फॅशन स्टेटस जपणारे मास्क बाजारात
चंद्रपूर : वाढत्या कोरोना रुग्णांमुळे जिल्हा प्रशासनाने विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे बाजारपेठेत पुन्हा फॅन्सी मास्क बाजारपेठेत उपलब्ध झाले आहे. अनेकजण त्या मास्कला पसंती देत आहे.
विरंगुळा केंद्राकडे
मनपाचे दुर्लक्ष
चंद्रपूर : येथील नव्याने अस्तित्वात आलेल्या तुळशीनगर परिसरात विरंगुळा केंद्र आहे. मात्र केवळ नामफलक लावून संबंधित मोकळे झाले आहे. येथील ज्येष्ठांना बसण्यासाठी या केंद्राची दुरुस्ती करावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे, या विळंगुळा केंद्रामध्ये झुडपे तसेच गवत वाढले आहे. त्यामुळे महापालिका पदाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. विशेष म्हणजे, याबाबत अनेकवेळा निवेदनही देण्यात आले आहे.
धूर फवारणी
करण्याची मागणी
चंद्रपूर : शहरातील काही वाॅर्डात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात जागृती केली जात आहे. शहरातील सर्वच प्रभागात आरोग्य जागृतीला वेग आला आहे. मात्र, कोरोनासह इतर आजार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरातील वाॅर्डांमध्ये धूर फवारणी करून डासांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
पुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या
सावली : चंद्रपूर जिल्ह्यातील सावली व ब्रम्हपुरी तालुक्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र अद्यापही नुकसानभरपाई मिळाली नाही.
सॅनिटाईज करण्याची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. पूर्वी रुग्ण आढल्यानंतर संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात येत होता. मात्र आता केवळ ज्या घरी रुग्ण आढळला, तेथे बोर्ड लावून प्रशासन मोकळे होते. परंतु, परिसर सॅनिटाईज करीत नाही. त्यामुळे पुन्हा रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शाळा- महाविद्यालयातील उपस्थिती घटली
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शाळेने पुन्हा ५० टक्के उपस्थितीत शाळा सुरू केली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे पालकही आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास धजावत नसल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती घटली आहे.