श्रावण महिन्यातील सणांवर कोरोनाचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:31 AM2021-08-28T04:31:33+5:302021-08-28T04:31:33+5:30
चंद्रपूर: कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे. मात्र तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध ...
चंद्रपूर: कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे. मात्र तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले आहे. भारतीय संस्कृतीत श्रावण महिना पवित्र मानला जातो. विशेषत: श्रीकृष्ण जन्माष्टमी, पोळा, गणेशोत्सव आदी सण मोठ्या उत्साहात सार्वजनिक ठिकाणी साजरे केले जातात. मात्र कोरोनामुळे मागील अनेक वर्षांची परंपरा खंडित होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांवर शेतकऱ्यांचा पोळा या सण आहे. याला ग्रामीण भागात विशेष महत्व आहे. पोळा हा सण श्रावण अमावस्था या तिथीला साजरा केला जातो. शेतीत राबराब राबून धान्य पिकवून देणाऱ्या बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण असतो. पोळ्याच्या एक दिवसपूर्वी बैलांना अंघोळ घालण्यात येते. सायंकाळी बैलांची पूजा करून हळद तुपाने खांद शेकल्या जाते. जेवणाचे आवतन देण्यात येते. पोळ्याच्या दिवशी बैलांच्या अंगणावर गेरुचे ठिपके, शिंगाला बेगड, बाशिंग, मटाट्या, कवड्या, घुंगराच्या माळा, नवीन वेसण, नवा कासरा, झुली टाकून सजविल्या जाते. बैलजोड्या, वाजंत्री, ढोल, ताशे वाजवत सार्वजनिक ठिकाणी (आखर) आणले जाते. यावेळी होणाऱ्या झडत्यांनी पोळ्यात उत्साह संचारतो. हनुमान मंदिरात भजन, पूजनाने गुढी फिरवून गावचा पाटील किंवा मानवाईकांच्या हाताने तोरण तोडले जाते. पोळा फुटल्यानंतर घरी महिला बैलांना आणि घरगड्यास, शेतगड्यास ओवाळणी घालतात.
दुसऱ्या दिवशी तान्हापोळा भरतो. लहान मुले लाकडी बैल सजवून मंदिराच्या पारावर एकत्र घेऊन पोळा साजरा करतात. गावात मिरवणूक काढतात. मात्र यावेळी. मात्र यावर्षीही या सर्वांवर विरजण पडणार असल्याची शक्यता आहे. कोरोनामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमी, पोळा, तान्हा पोळा आदी सण सार्वजनिक ठिकाणी न करता आपापल्या घरीच साजरे करावे लागणार आहे. यासंदर्भात आता काही राजकीय पक्षांनी आंदोलन करून सण, उत्सव साजरे करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. मात्र शासन काय निर्णय घेते याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोळ्यात लहान मुलांना विशेष भाग घेता येत नाही. म्हणून बालकांची हौस पुरविण्यासाठी तान्हा पोळा साजरा केला जातो. तान्हा पोळ्याच्या दिवशी बालक आपापले लाकडी बैल सजवून मंदिराच्या पाराजवळ एकत्र येतात. यावेळी विविध विशेभूषा स्पर्धा, बैल सजावटीच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात.
बाॅक्स
गणेश उत्सवावरही परिणाम
पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून यावर्षीही लहान मूर्तीचा निर्णय सकारात्मक असला तरी कोरोनामुळे गणेश मूर्ती बनवून उपजीविका करणाऱ्यांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. सद्यास्थितीत मंडळांनी गणेश मूर्तीचे बुकिंग सुद्धा केलेले नाही. दरम्यान, धर्मादाय आयुक्तांनी सण उत्सवांसाठी आवश्यक परवानगी घेऊन वर्गणी गोळा करण्याची परवानगी दिली आहे. मात्र हे सर्व उत्सव अगदी मर्यादितच साजरे करावे लागणार आहे.