पक्ष्यांच्या अस्तित्वावर संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 11:22 PM2018-05-11T23:22:49+5:302018-05-11T23:22:49+5:30
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हटले की वाघाचेच नाव पुढे येते. त्याला कारणेही तितकीच आहेत. मात्र, वाघांच्या अधिवासापलिकडेही वन्यजीव व दुर्मिळ पक्ष्यांचे जगही मोठे असते, याची बऱ्याच पर्यटकांना जाणिव नसते.
राजेश मडावी।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हटले की वाघाचेच नाव पुढे येते. त्याला कारणेही तितकीच आहेत. मात्र, वाघांच्या अधिवासापलिकडेही वन्यजीव व दुर्मिळ पक्ष्यांचे जगही मोठे असते, याची बऱ्याच पर्यटकांना जाणिव नसते. अंत:करणातून पक्ष्यांच्या भावविश्वाशी समरस होण्याऐवजी ते कॅमेºयाच्या कृत्रिम डोळ्यांद्वारे वाघाचा शोध घेऊ लागतात. अभिजित बियाणी व निखिल दांडेकर या दोन अभ्यासकांनी मोठ्या कष्टाने क्षेत्रकार्य करून तब्बल २५५ पक्ष्यांच्या प्रजातींची सूची प्रकाशित केली. त्यामध्ये काही स्थलांतरीत पक्ष्यांचाही समावेश असून देशभरातील पर्यटकांना येथील पक्षिवैभव खुणावू शकते. स्थानिकांसोबतच स्थालांतरीत पक्षांचे थवे ताडोबा प्रकल्पाकडे झेप घेण्यास नैसर्गिक संसाधनाने समृद्ध आहेत. मात्र, मानवी हस्तक्षेपामुळे पक्ष्यांचे अस्तित्व संकटात सापडले आहे.
ताडोबा-अंधारी राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प हा आकाराच्यादृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पालगत विविध तलावांवर विविध प्रकारातील पक्ष्यांच्या प्रजाती विहार करताना आढळतात. भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमाअंतर्गत या प्रजातींच्या संरक्षण व संवर्धनासाठी अटी घालून दिल्या आहेत. विपूल जैवविविधता, वनस्पती, कृमी किटकांपासून तर वाघाच्या संरक्षणासाठी अनेक उपायोजना करण्यात आल्या. उपाययोजनांची अंमलबजावणी कशी होते, हा अभ्यासाचा स्वतंत्र विषय असला तरी व्याघ्र प्रकल्पातील पक्षिवैभवाकडे आता नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची सकारात्मक दृष्टी तयार होत आहे. वन विभागाने २००३ सर्वप्रथम पक्षीसूची तयार केली. त्यामध्ये २३८ पक्ष्यांची नोंद झाली होती. महाबळ यांनी २००६ ला केलेल्या सर्वेक्षणानुसार १९२ प्रजाती आढळल्या. याशिवाय, अतुल धामनकर, डॉ. राजू कसंबे व कुºहाडे आदींही ताडोबातील स्थानिक व स्थलांतरीत पक्ष्यांच्या नोंदी घेऊन पुस्तके तसेच सूची प्रकाशित केली. अभ्यासाची हीच परंपरा अभिजित बियाणी तसेच निखिल दांडेकर यांनी पुढे नेली. बियाणी हे पुण्यातील इंडियन इन्स्टिट्युट आॅफ सायन्स एज्यूकेशन अॅण्ड रिसर्च संस्थेशी संबधित आहेत. दांडेकर हे पक्षिशास्त्राचे अभ्यासक असून सप्टेंबर २०१० ते मे २०१५ या कालावधीत ताडोबा व्याघ्र प्रकल्पात केलेल्या संयुक्त अभ्यासाच्या आधारावर त्यांनी २५५ प्रजातींची सूची तयार केली. वन विभाग व ताडोबा व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक विभागाने याच पक्षी सुचीला मान्यता प्रदान केली. प्रत्येक पक्ष्यांची गुण वैशिष्ट्ये, अधिवास क्षेत्र, जगभरातून स्थलांतर आणि देश-जागतिक पातळीवरील बहुविध पक्ष्यांचे नैसर्गिक स्थान त्यांनी अधोरेखित केले. त्यामुळे ताडोबाचे पक्षिवैभव नजरते भरते. वाघोबासोबतच पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धन करणे किती गरजेचे आहे, याचाही संदेश देते. जिल्हाधिकारी कार्यालयाने ‘चांदा मुलूख’ नावाची देखणी पुस्तिका प्रकाशित केली. त्यामध्ये जिल्ह्यातील दुर्मिळ पक्षी प्रजातींची छायाचित्रासह नोंद आहे.
स्थलांतरित पक्ष्यांची हवी स्वतंत्र सूची
पक्षी स्थलांतरादरम्यान मूळ वसतिस्थान ते हिवाळी मुक्काम आणि परत मूळ वसतिस्थान असा प्रवास करतात, अशी नोंद अभ्यासकांनी केली आहे. चक्रवाक पक्षी हिवाळ्यात दक्षिण भागात स्थलांतर करतात. आर्क्टिक टर्न हा पक्षी सर्वात मोठे स्थलांतरण करतो. तो उत्तर ध्रुव ते दक्षिण धु्रव ते परत उत्तर ध्रुव असा सुमारे ३६,००० कि.मी.चा प्रवास एका वर्षात पूर्ण करतो. १५९ प्रजातींचे पक्षी स्थलांतर करून महाराष्ट्रात येतात. थापट्या, नकटा, शेंडीबदक, लालसरी, थोरले व धाकटे मराल,तरंग, गडवाल, चक्रवाक ही बदके, कादंब व पट्टकादंब हे गूज, चमचा, अवाक, तुतवार, शेकाट्या, कारंडव, उचाट, सोनचिलखा, कुरव असे पाणथळीचे पक्षीही येतात. याशिवाय, गप्पीदास, कस्तुर, शंकर, धोबी, क्रौंच या पक्ष्यांबरोबरच दलदल ससाणा, शिक्रा, कवड्या, हारिण, तिसा, श्येन कुकरी, खरुची हे शिकारी पक्षीही ताडोबासह प्रकल्पासह विदर्भातील अन्य जिल्ह्यांच्या अभयारण्य क्षेत्रातील तलावांवर येत असल्याच्या नोंदी अनेक ग्रंथांमध्ये आढळतात. त्यामुळे स्थलांतरीत पक्ष्यांची स्वतंत्र सूची तयार करण्यात करण्याची गरज आहे.
तलावांमध्ये निरुपयोगी वनस्पतींचा विस्तार
थंडीचे वारे वाहू लागल्यानंतर काही स्थलांतरित पक्ष्यांचे थवे हजारो किलोमीटरचा प्रवास करून ताडोबा व्याघ्र प्रकल्पानजिकच्या तलावांवर उतरत असले तरी सिमेंटची जंगले, प्रदुषणाची तीव्रता पक्षांसाठी घातक ठरत आहे. त्यामुळे दरवर्षी स्थलांतरित पक्ष्यांचे प्रमाण कमी होत आहे. त्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला. पाणथळ भूमी, वनजमिनीवर काही पक्षी येतात. गवत, कीटक, अळी, अंडी फस्त करून उपजीविका चालवितात. आॅगस्ट, सप्टेंबरपासून स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सुरू होते. एप्रिलनंतर हे पक्षी परतीच्या प्रवासाला निघतात, असे निरीक्षण मोहुर्ली येथील गंगाराम सिडाम यांनी नोंदविले. शेतीमध्ये खताचा अतिरिक्त वापर, पाण्यातील विषारी रसायने, प्लास्टिकमुळे पक्ष्यांना विषबाधा होत आहे. ताडोबा क्षेत्रालगतच्या काही तलावांमध्येही विषारी आणि निरुपयोगी वनस्पतींनी विस्तार वाढल्याने काही वर्षांत पक्ष्यांवर उपासमारीचे संकट ओढवू शकते. आदिवासींच्या वन हक्कांवर गदा न आणता स्थलांतरित पक्ष्यांचे संवर्धन व संरक्षणासाठी लोकसहभाग वाढविला पाहिजे, असेही त्यांनी नमुद केले.
६२ प्रजाती संकटग्रस्त
जिल्ह्याची भौगोलिक स्थिती आणि पक्ष्यांच्या अधिवासाची संख्या बरीच आहे. गावखेड्यांमध्ये माजी मालगुजारी तलावांच्या सानिध्यात विविध प्रकारच्या पक्ष्यांनी आश्रय घेतला होता. मात्र, या तलावांच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न न झाल्याने अनेक पक्ष्यांनी अधिवासाचे क्षेत्र बदविले. काहींनी अन्य भूभागात स्थलांतर केले. महाराष्ट्रात आजपर्यंत ५८० पक्ष्यांची नोंद करण्यात आली. पैकी किमान ६२ प्रजाती संकटग्रस्त असल्याचे बाम्बे नॅचरल हिस्टी सोसायटी संस्थेचा अहवाल सांगतो.
रासायनिक खतांचा अतिवापर करण्याचे प्रमाण वनक्षेत्रालगतच्या अनेक गावांमध्ये सुरू आहेत. शेतातील पाणी तलाव अथवा नाल्यात शिरल्याने शेतीउपयोगी पक्ष्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला. जिल्ह्यातील गिधाळांचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे. पाळीव जनावरांना रोगप्रतिबंधक लस टोचताना बºयाचदा आरोग्य निकषांचे पालन केले जात नाही. त्यामुळे जनावरांचा मृत्यू होतो. या मृत जनावरांवराचे मांस खाल्यान गिधाडांच्या काही प्रजाती नष्ट झाल्या, असा निष्कर्ष बीएनएचसी संस्थेने काढला आहे.