वन्यप्राण्यांमुळे पिकाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 10:32 PM2018-11-16T22:32:21+5:302018-11-16T22:32:37+5:30
पर्यावरण संवर्धनासाठी वन्यजीवाच्या संरक्षणात बफर झोन क्षेत्र तयार करण्यात आले. या क्षेत्रात शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हानी झालेली आहे. शेतकऱ्यांचे अपार कष्ट मातीमोल होत असून पिकांच्या नुकसानीमुळे पुन्हा शेतकरी वर्ग समस्यांच्या विळख्यात सापडलेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मारोडा : पर्यावरण संवर्धनासाठी वन्यजीवाच्या संरक्षणात बफर झोन क्षेत्र तयार करण्यात आले. या क्षेत्रात शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हानी झालेली आहे. शेतकऱ्यांचे अपार कष्ट मातीमोल होत असून पिकांच्या नुकसानीमुळे पुन्हा शेतकरी वर्ग समस्यांच्या विळख्यात सापडलेला आहे.
केवळ आणि केवळ पावसाच्या भरवशावर उभा राहण्याचा प्रयत्न शेतकरी वर्ग करतो. मागील वर्षी धान पिकांचे पावसाअभावी मोठे नुकसान झाले. कर्ज काढले, तेही पुरते फेडले गेले नाही. यावर्षी पुन्हा कर्ज काढून पीक जोमाने उभे केले. मात्र वन्यप्राण्यांनी उभे पीक उद्ध्वस्त करणे सुरू केले आहे.
मागील दोन महिन्यांपासून शेतकरी सुखाने झोपलेला नाही. अगदी मावळतीच्या पूर्वी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास २० ते २५ च्या समुहाने येणाऱ्या रानडुकरांनी उभ्या लोंबाच्या धानपिकांत प्रचंड हैदोस घालणे सुरू केले आहे. साधरणत: सायं ४ वाजताच्या सुमारास उब्बा घेऊन शेतकरी घराबाहेर पडतो. आणि रानडुकरांना हाकलून लावण्यासाठी वारंवार ओरड करीत असतो. रात्रभर डोळ्यांना झोप नाही, अशा स्थितीतही त्यांनी पिकांना सरंरक्षण देण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी अनेक शेतकऱ्यांचे नुकसानच झाले. यापूर्वीचा नुकसान भरपाईचा प्रस्ताव वनविभागाकडे पडून आहे. त्याची चौकशी होईल. त्या चौकशीत वेगवेगळे सदस्य एकत्रित जमा होतील. त्यानंतर नुकसान भरपाई किती द्यायची ते ठरवतील. ही दरवर्षीची समस्या आहे. स्थानिक रोजगार नाही. दुधाळू जनावरांना ही वन्यप्राण्यांच्या भीतीपोटी चारा नाही. नेमके शेतकºयांनी काय करायचे, हा गंभीर प्रश्न त्यांच्या समोर सध्या उभा ठाकला आहे.