पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना देण्यात यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:33 AM2021-02-05T07:33:12+5:302021-02-05T07:33:12+5:30
सिंदेवाही : यावर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना तोट्याचा ठरला आहे. अकाली पावसाने व मावा तुडतुडा यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. ...
सिंदेवाही : यावर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना तोट्याचा ठरला आहे. अकाली पावसाने व मावा तुडतुडा यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे विमा काढलेल्या शेतकऱ्यांना विम्याचे पैसे ३० दिवसांच्या आत देण्यात यावे, अशी मागणी शेतकरी शेतमजूर महासंघाने पंतप्रधान, मुख्यमंत्री, पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.
शेतकरी शेतमजूर महासंघाची सभा रघुनाथ शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी शेतकऱ्यांनी खरीप धान पिकासाठी सहकारी संस्था, सहकारी व राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज घेतले. यावेळी प्रधानमंत्री पीक विमा योजनानुसार शेतकऱ्यांच्या कर्जामधून हेक्टरी ८५० रूपये विमा हप्ता कपात करण्यात आला. सदर हप्ता विमा कंपनीत जमा करण्यात आला. शेतकऱ्यांच्या पिकास नैसर्गिक आपत्तीत नुकसानीसाठी विमा संरक्षण देण्यात आले. प्रति हेक्टर ४२ हजार ५०० रूपये नुकसान भरपाई प्रधानमंत्री पीक योजनेत नमूद असून ३० दिवसांच्या आत पीक विमा शेतकऱ्यांना देणे कंपनीचे कर्तव्य आहे.
यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने शेतात पीक उभे केले. परंतु पीक हातात येताना अवकाळी पावसामुळे व मावा तुडतुडा या किडीचा प्रादुर्भाव झाल्याने पीक नष्ट झाले. पीक वाचविण्याचे शेतकऱ्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. कित्येक शेतकऱ्यांनी धान पिकाची कापणी केली नाही. कुणाला हेक्टरी आठ तर कुणाला हेक्टरी दहा क्विंटल धानाचे उत्पादन झाले. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेनुसार पिकाच्या नुकसानीसाठी सुरक्षा कवच ३० दिवसात मिळणार या आशेने शेतकरी वाट पाहून थकले. सदर विमा कवच शेतकऱ्यांना देण्यात यावे, अशी मागणी शेतकरी शेतमजूर महासंघाने केली आहे. सभेला तालुक्यातील ३५० शेतकरी उपस्थित होते. यात चंद्रशेखर चन्ने, जगन्नाथ महाजन,राजू ताडाम, दिनकर बोरकर, लोकमित्र गेडाम, ऋषी लोखंडे, लता गेडाम, यादव बोरकर,मयूर सुचक, अरुण कोलते, मुखरू बनसोड, जानकीराम वाघमारे,सुलभा कामडी आदींचा समावेश होता.