पाणी आटलेल्या धरणात पिकांची लागवड
By admin | Published: January 6, 2016 01:29 AM2016-01-06T01:29:22+5:302016-01-06T01:29:22+5:30
उन्हाळा लागणाऱ्याला कित्येक दिवसाचा कालावधी शिल्लक असताना वरोरा तालुक्यातील चंदई लघु धरण काही दिवसांपूर्वीच आटले आहे.
वरोरा तालुका : उन्हाळ्यापूर्वीच चंदई लघु धरण पडले कोरडे
वरोरा : उन्हाळा लागणाऱ्याला कित्येक दिवसाचा कालावधी शिल्लक असताना वरोरा तालुक्यातील चंदई लघु धरण काही दिवसांपूर्वीच आटले आहे. धरण आटताच काही शेतकऱ्यांनी संपूर्ण धरणात नांगरणी करुन पिके घेण्यास सुरुवात केली आहे.
वरोरा तालुक्यातील निमढेला गावानजीक चंदई लघु धरण आहे. या धरणात ताडोबा लगतच्या रामदेगी जंगलातील टेकड्या नाले यामधून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी येवून त्याची साठवणूक होते. धरणातील पाण्याचा उपयोग सिंचनाकरिता होतो. धरण परिसरात जंगल असल्याने जंगली प्राणी पाणी पिण्याकरिता धरणात येत असतात. चंदई नाला धरण बांधून कित्येक वर्षाचा कालावधी झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी लिकेजस असल्याने पाणी वाहून जात असते. सोबतच धरणातील गाळ मागील काही वर्षापासून काढण्यात आला नसल्याने धरणातील पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. उन्हाळा येण्याला बराच कालावधी शिल्लक असताना धरण कोरडे पडले. त्यामुळे या संपूर्ण धरणात शेतकऱ्यांनी नांगरणी करीत पिके घेणे सुरू केले आहे.
निमढेला व परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ठराव घेवून चंदई लघु धरणातील ३० टक्के पाणीसाठा शिल्लक ठेवण्याची मागणी केली होती. पाणी धरणात राहिल्यास धरणालगतच्या गावातील पाण्याची पातळी कायम राहून उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. पाटबंधारे विभागाने ३० टक्के पाणी शिल्लक ठेवण्याचे आदेश काढले. परंतु आदेशाची अंमलबजावणी न केल्याने धरण कोरडे पडले आहे. (तालुका प्रतिनिधी)