ऐनवेळी कपाशीचे पीक धोक्यात
By admin | Published: October 3, 2015 12:51 AM2015-10-03T00:51:51+5:302015-10-03T00:51:51+5:30
मागील आठवड्यात सातत्याने तीन दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडला.
शेतकऱ्यांनी करावे काय ? : अकाली पावसाचा परिणाम
वरोरा : मागील आठवड्यात सातत्याने तीन दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. या पावसामुळे अनेक शेतातील कपाशीच्या झाडाचे मुळे जमिनीतून बाहेरच येत कपाशीचे झाडे वाळून गेले आहे. येत्या काही दिवसात कापूस हाती येणार असताना अकाली पावसाने कपाशीचे झाडे वाळत चालल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
यावर्षीचा हंगामात पावसाने चांगली सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड केली. पावसाने काही काळ विश्रांती त्यानंतर पाऊस आल्याने कपाशी पिकाची आंतर मशागत चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना करता आल्याने कपाशीचे पिक चांगले आहे. सध्या कपाशी पिकाला पात्या व बोंड असल्याने दसऱ्यामध्ये कापूस विकण्याचे मनसूबे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी रचले होते. अनेक ठिकाणी कपाशीच्या झाडांना कापूसही दिसू लागला असल्याने शेतकरी आनंदी दिसत होता. परंतु मागील आठवड्यात पावसाने तीन दिवस बस्तान मांडल्याने शेतकऱ्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले असल्याचे दिसून येत आहे. तीन दिवस सातत्याने पाऊस झाल्याने वरोरा तालुक्यातील माढेळी, येवती, नागरी, शेंबळक, डोंगरगाव, चिकणी आदी गावालगतच्या कपाशीच्या शेतातील कपाशीचे झाडे वाळत आहे. शेतात पाणी साचल्यामुळे कपाशीच्या झाडाच्या मुळांनी जमीन सोडून दिल्याने बोंड व पात्या असलेले कपाशीचे झाडे जमिनीवर लोळत आहे. तर मुळ कमजोर झाल्याने झाडाची द्रव्य शोषण्याची शक्ती कमी झाल्याने अनेक रोग कपाशींवर आले आहे. त्यामुळे या संकटाचा सामना कसा करावा, या चिंतेत शेतकरी सापडला आहे. रोखीचे समजले जाणारे कपाशीचे पिक हातात येत असताना संकटे आल्याने कापूस उत्पादक शेतकरी तूर्तास हवालदिल झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)
जी कपाशीचे झाडे जमिनीपासून झुकली व सुकली आहे, अशा झाडांना मातीचा आधार देऊन पायाने हलका दाब देऊन झाड उभे करावे. झाडाच्या बुंध्याजवळ आवळणी करावी. युरिया १०० ग्रॅम, कॉपर आॅक्सीफ्लोराईड वीस ग्रॅम, ह्युमिक अॅसीड २० ग्रॅम याप्रमाणे दहा लिटर पाण्यात मिश्रण करुन प्रादुर्भाव ग्रस्त झाडाच्या बुंध्याजवळ द्यावे.
-प्रशांत राऊत, संशोधक एकार्जुन