चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने विकसित केले सहा दाण्यांच्या तुरीचे वाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 07:08 PM2018-01-08T19:08:09+5:302018-01-08T19:10:10+5:30
तुरीच्या शेंगामध्ये तीन ते चार दाणे असल्याचे सर्वांनाच माहित आहे. परंतु, चारगाव येथील शेतकऱ्याने एका तुरीच्या शेंगात सहा दाणे असलेली तूर विकसित केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : तुरीच्या शेंगामध्ये तीन ते चार दाणे असल्याचे सर्वांनाच माहित आहे. परंतु, चारगाव येथील शेतकऱ्याने एका तुरीच्या शेंगात सहा दाणे असलेली तूर विकसित केली आहे. पुढील हंगामात हे वाण बाजारपेठेत आणण्याचा संकल्प जाहीर केला. विशेष म्हणजे, या बियाणाला त्यांनी पत्नीचे नाव, वंदना असे दिले आहे.
चारगाव (बु.) येथील शेतकरी मधुकर भलमे यांनी मागील पाच वर्षांपासून तुरीचे पीक घेत आहेत. त्यांच्याकडे स्वत:ची केवळ अडीच एकर शेती आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून ते इतरांची शेती भाड्याने करीत आहेत. दरवर्षी तुरीच्या पिकात काही झाडांना एका शेंगामध्ये पाच ते सहा दाणे आढळून आले. त्यामुळे तुरीचे पीक काढताना भलमे यांनी पाच ते सहा दाणे असलेल्या शेंगा इतर तुरीपासुन वेगळे काढले. शिवाय, दरवर्षी वेगळ्या जागेत लागवड केले. हा प्रयोग मागील पाच वर्षांपासून सुरू होता. दरम्यान, भाड्याची शेती घेऊन लागवडीचे क्षेत्र सुमारे ७० एकरापर्यंत नेली. त्यामध्ये या नव्या बियाण्यांची लागवड केली. पाच ते सहा दाने असलेल्या तुरीच्या एका झाडाला एक हजार ते बाराशे शेंगा लागल्या आहेत. या विकसित तुरीच्या वाणाला पत्नी वंदना यांचे नाव दिले. पुढील हंगामात हे बियाणे शेतकऱ्यांना माफक दरात उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती भलमे यांनी दिली.