५०० हेक्टरवर पीक धोक्यात
By admin | Published: October 16, 2016 12:46 AM2016-10-16T00:46:38+5:302016-10-16T00:46:38+5:30
बल्लारपूर तालुक्यातील मानोरा, इटोली, कवडजई, हरणपायली, किन्ही, पळसगाव व कोर्टी या गावातील १८०० हेक्टरमधील...
शेतकऱ्यांमध्ये भीती : धानपिकांवर तुडतुडा व खोडकिडीचा प्रादुर्भाव
कोठारी : बल्लारपूर तालुक्यातील मानोरा, इटोली, कवडजई, हरणपायली, किन्ही, पळसगाव व कोर्टी या गावातील १८०० हेक्टरमधील धानपिकांवर तपकिरी तुडतुडा व खोड किडीचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. यामुळे ५०० हेक्टरवरील धानपीक धोक्यात आले असल्याने शेतकऱ्यात प्रचंड भीती निर्माण झाली आहे.
सध्या धानपिक गर्भावर आलेले आहे. अवघ्या एक महिन्यात धानाचे उत्पादन हाती येणार आहे. अशा वेळी तपकिरी तुडतुडा व खोडकिड रोगाची मोठ्या प्रमाणात पिकावर लागण झाली असून धानाच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांच्या हातात येणारे पीक या रोगांमुळे तणसात रुपांतरित होवून उभे पीक उद्ध्वस्त होत असल्याने शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. ही कीड ज्या जमिनीत पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात होत नाही व दाट रोवणी केली असेल तसेच युरीया खताचा जास्त प्रमाणात वापर केला असेल, अशा शेतात लागते. तिथेच या रोगांचा प्रादुर्भाव जास्त आढळून येत आहे. या रोगांमुळे पिकांच्या खोडातील अन्नरस शोषून भातपिकाची पाने पिवळी पडतात व पाने वाळून जातात व संपूर्ण पीक करपल्या जाते. त्यामुळे धानपिकातून लोंब बाहेर पडत नाही व बाहेर पडले तर लोंब परिपक्व होत नाही. परिणामी शेतातून केवळ तणस मिळते. सध्या या रोगामुळे धान शेतीत तणस निर्माण झाल्याचे प्रत्यक्ष दिसून येत आहे.
याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभागाला तक्रार करून प्रत्यक्ष पाहणी करुन या रोगावर प्रतिबंध करण्याच्या उपायाबाबत मार्गदर्शनाची मागणी केली. बल्लारपूर तहसीलदार विकास अहीर, संवर्ग विकास अधिकारी बी.बी. गजभे, कृषी अधिकारी नरेश ताजणे, कृषी विस्तार अधिकारी सुधाकर खांडरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून या किडीवर नियंत्रणासाठी मार्गदर्शन केले व शेतकऱ्यांना घाबरू नये. योग्य उपाययोजना करण्याचे सूचविले.
धान पिकावर तुडतुडा रोग पसरला असून त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होवून शेतकरी कर्जबाजारी होणार आहे. शासनाने पाहणी करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी रमेश पिपरे यांनी केली आहे. (वार्ताहर)
या किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८ एस.एल २.२ मि.मी किंवा फिप्रोनिल ५ टक्के २० मिली किंवा थायोमिथोकझाम २५ डब्ल्यू. किंवा मॅलाथिलॉन ५० टक्के प्रवासी २० मिली. किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही १४ मिली यापैकी एक किटकनाशक १० लिटर पाण्यात मिसळवून फवारणी केल्यास हा रोग आटोक्यात येतो. शेतकऱ्यांनी भीती न बाळगता रोगांवर उपाययोजना करावी, असे आवाहन बल्लारपूर पंचायत समितीचे कृषी अधिकारी नरेश ताजणे यांनी केले आहे.