पहाडावरील पिके जमीनदोस्त !
By admin | Published: September 21, 2015 12:46 AM2015-09-21T00:46:04+5:302015-09-21T00:46:04+5:30
निसर्गाच्या भरवश्यावर शेती करणाऱ्या पहाडावरील शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पिक बुधवार व गुरुवारदरम्यान कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे आडवे झाले.
मुसळधार पावसाचे तांडव : पहाडावर निसर्ग कोपला, अनेक शेतकऱ्यांचे नुकसान, कापूस, ज्वारीला फटका
शंकर चव्हाण जिवती
निसर्गाच्या भरवश्यावर शेती करणाऱ्या पहाडावरील शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पिक बुधवार व गुरुवारदरम्यान कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे आडवे झाले. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
यंदा तरी निसर्ग साथ देईल व भरघोस उत्पन्न मिळेल, अशी स्वप्ने बाळगणाऱ्या शेतकऱ्यांच्या ेआशेवर निसर्गाने पाणी फेरले आहे. अल्पावधीतच त्यांच्या स्वप्नाला विराम मिळाला आहे.
प्रस्तुत प्रतिनिधीने देवलागुडा, लोलडोह, रोडगुडा, पालडोह, धोंडाअर्जुनी, शेणगाव, नागापूर, धोंडाअर्जुनी, टेकाअर्जुनी आदी परिसरातील विठ्ठल जाधव, अंकुश राठोड, पोमा जाधव, पांडूरंग जाधव, सुधाकर भदाडे, रामराव राठोड, मारोती जाधव, बालू चव्हाण, उमाजी चव्हाण, गोविंद जाधव, प्रकाश जाधव, गोविंद राठोड, गणेश राठोड, बन्सी राठोड, शामराव राठोड, किशन राठोड, अशोक जाधव, सुभाष जाधव, किशन आडे, राधाबाई जाधव, रामराव चव्हाण, भिमराव राठोड, दुधराम चव्हाण, देविदास चव्हाण, राजाराम राठोड, उत्तम राठोड, दिगांबर जाधव, ज्ञानराज राठोड, विठ्ठल राठोड, मारोती राठोड, विठ्ठल मस्के, लक्ष्मण राठोड, रामदास फड, बालाजी पवार, वामन पवार आदी शेतकऱ्यांच्या शेतात फेरफटका मारला असता मोठ्या प्रमाणात कापूस पिकाचे नुकसान झाल्याचे दिसुन आले. सोबतच ज्वारी व सोयाबीनाचे नुकसान झाले आहे.
सतत तीन ते चार वर्षांपासून निसर्गाचे दृष्टचक्र असेच सुरू असल्याने खर्च अधिक आणि उत्पन्न कमी, असे समिकरण झाले आहे. यामुळे पहाडावरील शेतकरी सावरण्याऐवजी पुर्णत: खचला आहे. पांढऱ्या सोन्याच्या भरवश्यावर संसाराचा गाडा व सण उत्सव साजरे करणाऱ्या शेतकऱ्यांची स्वप्ने डोळ्यादेखत धुळीस मिळाली. दोन दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे संपुर्ण पिके जमीनदोस्त झाली. कोरड्या दुष्काळातून जीवदान मिळालेली पिके हिरवीगार झाली होती. त्यासाठी शेतकऱ्यांनी खत, औषधीवर मोठ्या प्रमाणात खर्चही केला. मात्र पहाडावर निसर्गाचा कोपच झाला की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. हिरवीगार झालेली पिके वारा व पावसाने आडवी झाली, तर काही झाडे तुटून पडल्याचे आढळून आले. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असुन मुलाबाळांच्या शिक्षणासह येणारे सण उत्सव साजरे कसे करायचे, संसाराचा गाडा कसा चालवायचा व पेरणीसाठी बि-बियाणे, खत औषधीसाठी घेतलेले बँक व सावकारी कर्जाची परतफेड करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. निसर्गाच्या या दृष्टचक्राला कुणालाही रोखता येणार नाही. पण झालेल्या नुकसानीची शासनाकडून मदत मिळाली तर पहाडावरील शेतकऱ्यांना जगण्याचा आधार मिळेल. त्यामुळे मदतीची मागणी होत आहे.
शेतकऱ्यांची दिवाळी जाणार अंधारात
दिवाळीचा सण दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. मात्र शेतकऱ्यांची केविलवाणी दशा बदलायची कोणतीही चिन्हे नाहीत. दिवाळी सणाला कामी येणाऱ्या कापूस पिकाचे मोठे नुकसान झाल्याने मुला-मुलींना नवनविन कपडे घ्यायचे कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षीचीही शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची परिस्थिती आहे.
१०,९१० हेक्टरवर कपाशीची लागवड
जिवती तालुक्यात १०,९१० हेक्टरवर कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे. ज्वारी १७७५ हेक्टर सोयाबीन ५६२ हेक्टर, तुर ११२० हेक्टरवर झाली असुन एकुण लागवडी खालील क्षेत्र १४६३८ हेक्टर आहे.
ंसमस्या सुटणार कधी
कोरडवाहु शेती करून संसाराच्या गाडा चालविणाऱ्या शेतकऱ्यांना रात्रंदिवस शेतात राबराब करून स्वत:साठी लागणारे अन्नधान्य पिकवूनही त्यांना पोटभर अन्न खायला मिळत नाही. इच्छा असुनही त्यांच्या मुलाबाळांना आर्थिक संकटामुळे उच्च शिक्षण मिळत नाही. या समस्यांनी पछाडलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या तरी कधी सुटतील, अशा प्रश्न शेतकरी विचारू लागला आहे.
परिसरातील काही शेतीची पाहणी केली असता त्यात ३० ते ४० बोंड लागलेल्या कापूस पिकाचे तसेच ज्वारीचे मोठ्या प्रमाणात अतिपावसामुळे नुकसान झाले असुन सर्व कृषी सहायकांना नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या असून नुकसान झालेल्या पिकाचे व क्षेत्राची माहिती मिळताच तसा अहवाल शासनाकडे पाठविला जाणार आहे.
- राज वानखेडे, तालुका कृषी अधिकारी, जिवती
बुधवार व गुरुवारी जिवती तालुक्यात दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळल्याने जिल्ह्यात सर्वाधित जास्त १६२ मि.मी. पावसाची नोंद जिवतीत झाली. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. या संदर्भात संपुर्ण क्षेत्राची माहिती व प्राथमिक अहवाल तात्काळ सादर करण्यासाठी कृषी विभाग अधिकारी, कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी यांना पत्र दिले असुन ते पाहणी करण्याला सुरूवात केली आहे.
- के.वाय. कुणारपवार, तहसीलदार, जिवती