मनपाकडे पावणेचार कोटी रुपये थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2017 12:34 AM2017-03-04T00:34:01+5:302017-03-04T00:34:01+5:30

चंद्रपूर शहराला इरई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. इरई धरणातून पाणी घेताना महानगरपालिका प्रशासनाला बिगर सिंचन पाणी पट्टी देयक पाटबंधारे विभागाकडे अदा करावे लागते.

Crores of rupees are worth tire to the corporation | मनपाकडे पावणेचार कोटी रुपये थकीत

मनपाकडे पावणेचार कोटी रुपये थकीत

Next

पाटबंधारे विभागाचा अल्टिमेटम : -तर पाणी पुरवठाच बंद करू!
चंद्रपूर : चंद्रपूर शहराला इरई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. इरई धरणातून पाणी घेताना महानगरपालिका प्रशासनाला बिगर सिंचन पाणी पट्टी देयक पाटबंधारे विभागाकडे अदा करावे लागते. मात्र मागील अनेक वर्षांपासून मनपा प्रशासनाने पाटबंधारे विभागाला पाणी पट्टी देयके अदाच केली नाही. याचे तब्बल तीन कोटी ७८ लाख ६८ हजार ५६४ रुपये मनपाकडे थकित आहेत. येत्या १० मार्चपर्यंत महानगरपालिका प्रशासनाने हा भरणा करावा अन्यथा ११ मार्चपासून इरई धरणातून मनपाला होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात येईल, असा अल्टिमेटमच पाटबंधारे विभाागाने मनपाला दिला आहे.
चंद्रपूरकरांची तहान भागविण्यासाठी दररोज ४० दशलक्ष मीटर पाण्याची गरज आहे. सद्यस्थितीत चंद्रपूरला इरई धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. चंंद्रपूरची लोकसंख्या चार लाखांच्या घरात गेली आहे. पूर्वी चंद्रपूरला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी जीवन प्राधीकरणाकडे होती. त्यानंतर पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी नगरपालिकेकडे देण्यात आली. बऱ्याच कालावधीपर्यंत नगरपालिकेने स्वत: ही जबाबदारी सांभाळली. त्यावेळी शहरात काही ठिकाणी पाईप लाईन बदलविण्यात आली होती. यालाही आता ५०-६० वर्षांचा कालावधी लोटला आहे. त्यानंतर पुढे कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे व वाढत्या कामाच्या ताणामुळे नगरपालिका प्रशासनाला शहराला पाणी पुरवठा करणे जिकरीचे होऊ लागले. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे खासगीकरण करण्यात आले. पाणी पुरवठ्याचे खासगीकरण झाल्यानंतरच पाणी पुरवठ्याचे धिंडवडे उडाले. वितरण व्यवस्थाच अस्तित्वात आहे की नाही, असेच वाटायले लागले.
सध्या शहराचा पाणी पुरवठा करण्याचे कंत्राट उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. मात्र या कंपनीचे वितरण व्यवस्थेकडे अजिबात लक्ष नसल्याने शहरभर पाण्यासाठी बोंबा मारल्या जात आहे. नवीन कनेक्शन देऊन ही कंत्राट कंपनी मोकळी होते. पुढे त्या कनेक्शनधारकाला व्यवस्थित पाणी मिळत आहे की नाही, हे पाहण्याचे सौजन्यही दाखविले जात आहे. एखाद्याने पाणी मिळत नाही, अशी तक्रार केली की त्याला पुन्हा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. पाणी पुरवठा तर व्यवस्थित नाहीच; पण इरई धरणातून पाणी घेण्याचे पाणी पट्टी देयकेही नियमित पाटबंधारे विभागाकडे या कंपनीकडून अदा केले जात नाही.
उल्लेखनीय असे की या उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीकडून शहरात होणारा पाणी पुरवठा व्यवस्थित नसल्याने नागरिकांची ओरड होऊ लागली. हा विषय सलग दोन-तीन आमसभेतही गाजला. त्यामुळे पाणी कराचा भरणा नागरिकांनी मनपाकडेच करावा, असे आवाहन करण्यात आले. आता पुन्हा उज्ज्वल कन्स्ट्रक्शनकडेच नागरिकांकडून हा भरणा केला जात आहे.
इरई धरणातून पाणी घेताना महानगरपालिका प्रशासनाला पाटबंधारे विभागाकडे बिगर सिंचन पाणीपट्टी म्हणून पैसे भरावे लागतात. मात्र मागील अनेक वर्षांपासून शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या कंपनीने व पर्यायाने महानगरपालिका प्रशासनाने पाटबंधारे विभागाकडे पाणी पट्टी देयकाचा भरणाच केला नाही. ही देयके थकित राहून राहून हा आकडा आता कोटीच्या घरात गेला आहे. तब्बल तीन कोटी ७८ लाख ६८ हजार ५६४ रुपये मनपा प्रशासनाला पाटबंधारे विभागाला द्यायचे आहे. पाटबंधारे विभागाकडून कराचा भरणा करण्यासाठी वारंवार मनपा प्रशासनाला नोटीस बजावली आहे. मात्र मनपाने याकडे आजवर गांभीर्याने लक्ष दिले नाही. आता मार्च महिना सुरू आहे. या महिन्यात पाटबंधारे विभागालाही आपले उद्दिष्ट साध्य करायचे असल्याने करवसुलीसाठी या विभागानेही कठोर पाऊल उचलले आहे. येत्या १० मार्चपूर्वी मनपा प्रशासनाने ही थकित पाणी पट्टी अदा केली नाही तर ११ मार्चपासून इरई धरणातून मनपाला होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात येईल, असा इशाराच पाटबंधारे विभागाने दिला आहे. या आशयाची नोटीसही या विभागाने मनपाला २३ फेब्रुवारीलाच बजावली आहे. (शहर प्रतिनिधी)
पाईपलाईन केव्हा बदलणार ?
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या इरई धरणातून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या पाणी पुरवठा करण्यासाठी अस्तित्वात असलेली पाईप लाईन ६० वर्ष जुनी असून खिळखिळी झाली आहे. ही पाईप लाईन केव्हाच कालबाह्य झाल्याचे महापालिका प्रशासनानेही मान्य केले आहे. असे असताना त्याच पाईप लाईनद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे अनेकवेळा शहरातील काही भागात नळाद्वारे दूषित पाणी येते. परिणामी ही खिळखिळी पाईप लाईन एकदाची केव्हा बदलेल, याची प्रतीक्षा चंद्रपूरकरांना आहे.

Web Title: Crores of rupees are worth tire to the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.