कारागृहात भाविकांची अलोट गर्दी

By admin | Published: October 25, 2015 12:47 AM2015-10-25T00:47:09+5:302015-10-25T00:47:09+5:30

मोहरमनिमित्त चंद्रपुरातील कारागृहाची दारे उघडली आहेत. येथील हजरत मखदुम ऊर्फ गैबीशाह वली यांच्या समाधिस्थळाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी ....

Crowd of devotees in jail | कारागृहात भाविकांची अलोट गर्दी

कारागृहात भाविकांची अलोट गर्दी

Next

इंग्रजकाळातील पार्श्वभूमी : मोहरमनिमित्त फुलले जिल्हा कारागृह
चंद्रपूर : मोहरमनिमित्त चंद्रपुरातील कारागृहाची दारे उघडली आहेत. येथील हजरत मखदुम ऊर्फ गैबीशाह वली यांच्या समाधिस्थळाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी शुक्रवारपासून कारागृह परिसरात रिघ लावली आहे. शनिवारी तर समाधीच्या दर्शनासाठी व पवित्र पाणी पिण्यासाठी अलोट गर्दी उसळली होती. यावेळी पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता.
येथील जिल्हा कारागृहात हजरत मखदुम ऊर्फ गैबीशाह वली यांचे पवित्र समाधिस्थळ आहे. मोहरमनिमित्त या समाधीचे दर्शन घेतले जाते. यासाठी चंद्रपूर जिल्हा कारागृह व दरगाह कमेटीने पूर्ण तयारी केली होती. हजारोच्या संख्येत भाविकांनी कारागृह परिसरात येऊन समाधीचे दर्शन घेतले. येथे एक विहीर असून तिचे पाणी आरोग्यासाठी गुणकारी असल्याची भाविकांची श्रध्दा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक हे पाणी पिऊन अंगाला लावतात. यावेळी प्रसादांची दुकानेही गिरनार चौकापासून कारागृह परिसरापर्यंत थाटली होती. चंद्रपुरातील प्रार्थनास्थळावरही रोषणाई करण्यात आली होती. हिंदू आणि मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणून या सणाकडे बघितले जाते. त्याचा प्रत्ययही शुक्रवार आणि शनिवारी आला. शुक्रवारी येथील समाधीवर भाविकांनी एकच गर्दी केली होती. शनिवारी तर भाविकांची गर्दी आणखी वाढल्याची माहिती कारागृहातील पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
विशेष म्हणजे, येथील या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आंध्र प्रदेश, विदर्भातील भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. एरवी नागरिकांना कारागृहात जाण्यासाठी रितसर परवानगी घ्यावी लागते. परवानगी मागूनही अनेक वेळा ती मिळत नाही. एवढेच नाही तर तेथे जाण्याची हिम्मतही कोणी करीत नाही. मात्र मोहरमनिमित्त येथील कारागृह दोन दिवसासाठी भाविकांसाठी खुले करण्यात येते. (शहर प्रतिनिधी)

सामाजिक संघटनांकडून
सरबत वितरित

मोहरमनिमित्त शहरातून मिरवणुका काढण्यात आल्या. यानिमित्त विविध सामाजिक संघटनांकडून सरबताचे वितरण करण्यात आले. छोटाबाजार चौक, गांधी चौक, गिरनार चौक, जटपुरा गेट या ठिकाणी शरबत वितरित करण्यात आले. याशिवाय मोहरमनिमित्त जिल्ह्यात अनेक ठिकाणी शरबत वितरित झाले.

सर्वांसाठी काँग्रेसजनांची
प्रार्थना

कारागृहातील पवित्र समाधीचे दर्शन घेतल्याने मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रध्दा आहे. मोहरमनिमित्त युवक काँग्रेसचे माजी महासचिव राहुल पुगलिया व शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी समाधीचे दर्शन घेत जिल्ह्यात सर्वधर्म समभावाची भावना वृध्दिंगत होवो व सर्वाचे जीवन निरोगी राहो, अशी प्रार्थना केली.

पोलिसांचा चोख
बंदोबस्त

मोहरमनिमित्त चंद्रपुरातील कारागृहाची दारे उघडण्यात आली. येथील समाधीच्या दर्शनासाठी हजारो भाविक येत असल्याने येथील सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता.

Web Title: Crowd of devotees in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.