पर्यटकांची गर्दी ओसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:27 AM2021-05-23T04:27:49+5:302021-05-23T04:27:49+5:30
जिवती : तालुक्यातील माणिकगड किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मागील काही दिवसापूर्वी वाढली होती. पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी ...
जिवती : तालुक्यातील माणिकगड किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मागील काही दिवसापूर्वी वाढली होती. पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येत होते. परिसरालगत असलेल्या विष्णू मंदिर, शंकर देव मंदिर, बुद्ध लेणी, अंमलनाला धरण येथेही पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत होते. सध्या कोरोना संकटामुळे पर्यटकांची गर्दी ओसरली आहे.
बांधकाम रखडल्याने नागरिक त्रस्त
वरोरा : परिसरातील अनेक गावांमध्ये सिमेंट रस्ते बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र, काही ग्रामपंचायतींना बांधकामाचा निधी न मिळाल्याने कामे थांबविली आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
गडचांदूर-जिवती मार्गाचे रुंदीकरण करा
जिवती : येथून नगराळा मार्गे जिवतीकडे जाणारा रस्ता अतिशय अरुंद आहे. त्यामुळे त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या मार्गावर अनेक प्रेक्षणीय स्थळे व तेलंगणा राज्याला जोडणारा असल्याने येथून वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, डोंगरमाथ्यावर हा मार्ग अतिशय अरुंद आहे.
पांदण रस्त्यावर अतिक्रमण वाढले
वरोरा : तालुक्यातील पांदण रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यासंदर्भात तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पांदण रस्ते व गावाची शिव आता संकटात आहे. त्यामुळे अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी पक्के रस्ते तयार करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
कुत्र्यांच्या हैदोसाने नागरिक त्रस्त
बल्लारपूर : शहरात रात्रीच्या वेळी मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीने जात असताना ही मोकाट कुत्री अचानक गाडीवर झेप घेतात. यामुळे अपघातही वाढले आहेत. कुत्र्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
सुमठाणा-तेलवासा रस्त्याची दुरवस्था
भद्रावती : तालुक्यातील सुमठाणा ते तेलवासा हा रस्ता आयुध निर्माणी चांदा यांच्या अखत्यारित येतो. मात्र, या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी केली जात आहे.
बायपास मार्गाअभावी वाहतुकीची कोंडी
ब्रह्मपुरी: शहरातील वाहनांची वर्दळ वाढली. मात्र, ब्रह्मपुरी-वडसा मार्गावर बायपास नाही. त्यामुळे वाहनांची दररोज कोंडी होती. अपघाताचा धोका लक्षात घेऊन शहरवासीयांसाठी बायपास मार्ग तयार करण्याची मागणी नागरिकांनी केली.
अतिक्रमण हटाव मोहीम थंडबस्त्यात
गोंडपिपरी : शहरातील विविध मार्गावर दुकानदार व काही नागरिकांनी अतिक्रमण केले. काहींना नोटीस बजावण्यात आले. त्यामुळे स्वत:हून अतिक्रमण हटविले. मात्र, बरीच अतिक्रमणे अजूनही जैसे-थे आहेत. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. शहरातील वाहतूक व्यवस्था योग्य ठेवण्यासाठी प्रशासनाने मोहीम सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वनसडी मार्गावर जीवघेणे खड्डे
कोरपना: वनसडी-भोयगाव-चंद्रपूर मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनधारकांना वाहन चालविणे जिकिरीचे झाले आहे. यामुळे अपघाताची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
रस्त्याअभावी नागरिकांना त्रास
जिवती : तालुक्यातील आंध्र-महाराष्ट्र सीमेवर असलेल्या काही गावात पक्के रस्ते नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या गावात रस्ते तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे.