लसीकरणासाठी जिवतीत बाहेरच्या तालुक्यातील नागरिकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:30 AM2021-05-07T04:30:00+5:302021-05-07T04:30:00+5:30
जिवती : येथे सोमवारपासून १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरणास सुरुवात झाली. मात्र लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करायची असल्याने तालुक्याबाहेरील नागरिकांनी मोठ्या ...
जिवती : येथे सोमवारपासून १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरणास सुरुवात झाली. मात्र लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करायची असल्याने तालुक्याबाहेरील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली. त्यामुळे येथील केंद्रावर तालुक्यातील नागरिकांपेक्षा बाहेरच्या तालुक्यातील नागरिकांची गर्दी दिसून आली. यामुळे तालुक्यातील नागरिकांना लसीकरणासाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे.
जिवती येथील विदर्भ महाविद्यालयात गुरुवारपासून १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी बंधनकारक होती. परंतु, जिवती तालुक्यात नेटवर्कची समस्या असल्याने तालुकावासीयांकडून अत्यल्प प्रमाणात नोंदणी करण्यात आली. याचाच फायदा घेत चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, गडचांदूर आदी लगतच्या तालुक्यातील नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी करून लसीकरणासाठी जिवतीचा पर्याय निवडला. परंतु, नोंदणी केली असल्याने त्यांना लस देण्यात आली.
बॉक्स
स्पॉट नोंदणीचा पर्याय द्यावा
जिवती तालुक्यात नेटवर्कची मोठी समस्या आहे. त्यामुळे ऑनलाइन नोंदणी करण्यास अडचण येते. याचा फायदा लगतच्या तालुक्यातील नागरिक घेत आहेत. जिवती तालुक्यातील नागरिक लसीकरणापासून वंचित राहू नयेत, यासाठी स्पॉट नोंदणी करून लसीकरण देण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
कोट
जिवती येथे एकच लसीकरण केंद्र देण्यात आले आहे. ऑनलाइन नोंदणीमुळे तालुक्याबाहेरील लोकांनी जिवतीला पसंती दिली. परंतु हा रिस्पॉन्स बघता तालुक्यातील नागरिकांसाठी ही जनजागृती आहे. आता तालुक्यातील नागरिक मागे राहणार नाहीत. येत्या आठवडाभरात तालुक्यात केंद्र वाढवण्यात येणार आहेत.
-डॉ. अंकुश गोतावळे,
वैद्यकीय अधिकारी,
कोविड केअर सेंटर, जिवती