खरेदीसाठी बाजारात गर्दी उसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:28 AM2021-04-21T04:28:20+5:302021-04-21T04:28:20+5:30
चंद्रपूर : कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयात बेडसुद्धा मिळत नसल्याची स्थिती असून दररोज २० ते २५ ...
चंद्रपूर : कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयात बेडसुद्धा मिळत नसल्याची स्थिती असून दररोज २० ते २५ जणांचा मृत्यू होत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांसोबत चर्चा करून जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. त्यामुळे नागरिकांनी मंगळवारी खरेदीसाठी बाजारात एकच गर्दी केली होती. विशेषत: भाजी बाजारामध्ये तर पाय ठेवायलाही जागा नसल्याची स्थिती होती.
जिल्ह्यात रुग्णसंख्या ४० हजारांवर गेली असून मृत्यूदरही दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णालयांत रुग्णांना जागा नसल्याची स्थिती आहे. मात्र, नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नसून बाजारासह अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. त्यामुळे रुग्ण कमी होण्यापेक्षा आणखीच वाढतच आहे. यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांसोबत चर्चा करून जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी एक पत्रक काढून २१ ते २५ तसेच २८ एप्रिल ते १ मे पर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे, या जनता कर्फ्यूमध्ये केवळ रुग्णालये, मेडिकल तसेच पेट्रोल पंप सुरू राहणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी किराणा तसेच भाजीपाला भरून ठेवण्यासाठी बाजारात गर्दी केल्याचे चित्र मंगळवारी दिवसभर बघायला मिळाले.
बाॅक्स
भाव कडाडले
जनता कर्फ्यूची घोषणा झाल्यानंतर नागरिकांनी बाजारात गर्दी केली. याच संधीचा फायदा उचलत काही व्यावसायिकांनी भाव वाढविल्याचा प्रकार आज बघायला मिळाला. विशेषत: भाजीचे भाव गगणाला भिडले आहे. सोबतच फळांचेही भाव वाढविण्यात आले. नागरिकांचा इलाज नसल्यामुळे मुकाट्याने त्यांनी खरेदी केली.
बाॅक्स
कोरोनाचा होणार प्रसार
जनता कर्फ्यूची घोषणा होताच नागरिकांनी बाजारात मोठी गर्दी केली. ज्या कारणासाठी जनता कर्फ्यू लावण्यात आला. त्यामुळेच गर्दीतून कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, बाजारात गर्दीवर नियंत्रणासाठी पोलीस अथवा महसूल प्रशासन फिरकलेसुद्धा नाही.