पिसाळलेल्या माकडाचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:23 AM2018-01-07T00:23:05+5:302018-01-07T00:23:43+5:30
शहरातील विठ्ठल मंदिर व पठाणपुरा वॉर्डात शुक्रवारी रात्रीपासून एका पिसाळलेल्या माकडाने धुमाकूळ घातला.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : शहरातील विठ्ठल मंदिर व पठाणपुरा वॉर्डात शुक्रवारी रात्रीपासून एका पिसाळलेल्या माकडाने धुमाकूळ घातला. रस्त्यावरील, घरातील अंगणात असलेल्या नागरिकांवर हे माकड तुटून पडायचे. या माकडाने हल्ला करुन सात लोकांंना गंभीररित्या जखमी केले. माकडाच्या या हैदोसाची माहिती इको-प्रोला मिळताच तत्काळ वनविभागाला कळविण्यात आले. वनविभाग व इको-प्रो यांनी संयुक्तपणे दोन तास रेस्क्यू आॅपरेशन राबवून माकडाला शनिवारी सकाळी जेरबंद केले.
शुक्रवारी माकडाचा कळप विठ्ठल मंदिर वॉर्डात आला होता. कळप परत गेल्यानंतर एक मोठे माकड तेथेच राहिले. त्यानंतर हे माकड विठ्ठल मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरावर उड्या मारत होते. त्यानंतर ते नागरिकांच्या अंगावर धावून येऊ लागले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण पसरले. काही वेळातच रस्त्यावरुन जाणाऱ्या देशराज गीरडकर व अजय सातोकर यांच्यावर माकडाने हल्ला चढविला. यात दोघेही जखमी केले.
शनिवारी सकाळी पुन्हा माकडाने हैदोस घालणे सुरू केले. याच परिसरातील पाच लोकांना गंभीररित्या जखमी केले. दरम्यान, याच परिसरातील विठोबा खिडकी येथे इको-प्रोचे किल्ला स्वच्छता अभियान सुरु होते. यावेळी त्यांना घटनेची माहिती देण्यात आली. इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात इको-प्रोची चमू घटनास्थळी दाखल झाली. यावेळी त्यांनी आजूबाजूचे रस्ते बंद करुन घटनास्थळावरुन नागरिकांचा जमाव दूर केला. त्यानंतर धोतरे यांनी घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी थिपे यांना दिली. थिपे यांनी वनविभागाच्या बेशुद्ध करणाºया रैपिड युनिटला पाचारण केले. त्यानंतर वनविभाग व इको-प्रोने तब्बल दोन तास रेस्क्यू मोहीम राबवून माकडास बेशुद्ध करुन जेरबंद केले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
सदर मोहिम राबविताना मानद वन्यजीव रक्षक बंडू धोत्रे, वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोडशलवार, वनरक्षक शूटर मिलिंद किटे, वनरक्षक शूटर अतिक बेग, इको-प्रो वन्यजीव विभाग प्रमुख नितीन बुरडकर, वनपाल राजू बडकेलवार, वनपाल दादाराव मेश्राम, वनरक्षक भुलेश रंगारी, वनमजूर किशोर डांगे, उमेश घनोडे, इको-प्रो चे सदस्य बिमल शहा, राजू काहीलकार, धर्मेंद्र लुनावत, अनिल अंडूरवार, हरिदास कोराम, विशाल रामेडवार, हरीश मेश्राम, रोशन धोतरे, रवींद्र गुरनुले, कपील चौधरी, वैभव मडावी, अतुल राखुंडे यांनी सहकार्य केले.
शुक्रवारी कुणीही घराबाहेर पडले नाही
शुक्रवारी रात्री पिसाळलेल्या माकडाचा विठ्ठल मंदिर वॉर्डात हैदोस सुरू होता. याच परिसरात इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांचे घर आहे. ते घरी असताना त्यांना याबाबत नागरिकांनी माहिती दिली. मात्र रात्रीची वेळ असल्याने बंडू धोतरे यांनी नागरिकांना शांत राहावे व कुणीही घराबाहेर पडू नये, असा सल्ला दिला. माकडाने दोघांना जखमी केल्याने वॉर्डातील कुणीही रात्री घराबाहेर पडले नाही. त्यानंतर शनिवारी सकाळी वनविभागाच्या पथकाला पाचारण करून माकडाला बेशुध्द केले.
यांना केले जखमी
यावेळी माकडाने नितीन बोडखे (४०) यांच्या डोक्याला चावा घेतला. त्यांना सहा टाके पडले. अजय रामेडवार (४०) यांच्या हाताला व पाठीला चावा घेतला. त्यांना २२ टाके पडले. अल्का खनके (३५) याच्या हाताला, कल्पना रागीट (४०) यांच्या डोक्याला आणि पाठीला, आकाश बेले यांच्या पाठीला माकडाने चावा घेऊन गंभीर जखमी केले.