सीटीपीएस-खैरगाव शिवारात आली मगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 11:01 PM2019-08-05T23:01:47+5:302019-08-05T23:02:03+5:30
सीटीपीएस खैरगाव शिवारात पुराच्या पाण्यात मगर आली. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून मगरीला रेस्क्यू करून वनविभाग व इको-प्रो टीमने सुरक्षित स्थळी सोडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सीटीपीएस खैरगाव शिवारात पुराच्या पाण्यात मगर आली. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून मगरीला रेस्क्यू करून वनविभाग व इको-प्रो टीमने सुरक्षित स्थळी सोडले.
मागील आठवडाभरापासून संततधार पावसामुळे नद्या दुथळी भरून वाहत आहेत. अशातच इरई धरण भरले असल्याने धरणाचे सातही दरवाजे खोलण्यात आले आहे. त्यामुळे धरण लगतच्या गावाच्या शेतशिवारात पाणी भरले आहे. या पाण्यासोबत एक पाच फुट लांब मगर सीटीपीएसला लागून असलेल्या आणि नदी काठावर असलेल्या खैरगावच्या शेतशिवारात आली. पाणी ओसरल्यानंतर शेतात आलेली मगर गावकऱ्यांना दिसली. त्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी झाली. नागरिकांनी यांची माहिती वनविभाग व इको-प्रोला दिली. चंद्रपूर वनविभागची टीम व इको-प्रो सदस्य घटनास्थळी दाखल झाले. वनविभागचे मिलिंद किटे, बेग आणि इको-प्रोचे सूमित कोहले यांनी रेस्क्यूचे काम सुरु केले. मगरीला जाळ्यात घेण्यात यश आले. नागरिकांच्या प्रचंड गर्दी आणि आरडाओरडमुळे रेस्क्यू आॅपरेशनमधे अडचणी निर्माण होत होत्या. मगर जाळीतून सुटण्याचा प्रयत्न करीत होती. इको-प्रो वन्यजीव संरक्षक दलसह संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे पोहचले. यानंतर नागरिकांना शांत करीत सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. जाळीत आलेल्या मगरीचे आधी तोंड बांधून व्यवस्थितरित्या रेस्क्यू करण्यात आले.
मगरीला धरणात सोडले
यानंतर रेस्क्यू चमूने वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी जी. गुरुप्रसाद, विभागीय वनअधिकारी अशोक सोनकुसरे यांच्याशी चर्चा करून त्यांचे मार्गदर्शनामधे सदर मगरीला बफर अंतर्गत येणाºया मोहर्ली वनक्षेत्रातील इरई धरणात सोडण्यात आले. यावेळी मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे, आगरझरी क्षेत्राचे वनपाल भूषण गजपुरे, रेस्क्यू चमूचे ए.आर. बेग, एम. कीटे, नंदू पडवे, धीरज दहेगावकर, वनमजूर के. जी .डांगे, एस. जी. रायपुरे, अंकित पडगीलवार, इको-प्रोचे आशिष मस्के, अमोल उत्तलवार, हरीश मेश्राम, सागर कावले, सचिन धोतरे आदी उपस्थित होते.