वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर सिटीपीएस कामगारांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2022 10:55 AM2022-02-18T10:55:40+5:302022-02-18T11:31:51+5:30
चंद्रपूर वीज केंद्र परिसरात गेल्या दोन दिवसांत वाघ-बिबट्याने हल्ला करून दोन जणांना उचलून नेले. या घटनांमुळे पुन्हा एकदा मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न चर्चेला आला आहे.
चंद्रपूर : वीज केंद्र परिसरात वाघाने कामगाराचा बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी रात्री बिबट्याने एका अल्पवयीन मुलाला उचलून नेले. यानंतर, परिसरात भीतीचे वातावरण असून वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर सिटीपीएस कामगारांनी मोर्चा काढला आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन भटारकर यांनी गुरुवारपासून दुर्गापूर परिसरात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ वीज केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावर कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. वनविभागाने वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी कामगारांनी केली आहे.
चंद्रपूरचे महाऔष्णिक वीज केंद्र ताडोबा अभयारण्याला लागूनच असल्याने या परिसरात जंगली श्वापदांचा नेहमीच वावर असतो. तर, गेल्या दोन दिवसांत वाघ व बिबट्याने दोन जणांना उचलून नेले आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास कामावरून सायकलने घरी परतत असलेल्या कामगाराला वाघाने हल्ला करत उचलून नेऊन ठार केले होते. त्यांच्या मृतदेह दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. तर, त्याच दिवशी रात्री एका १६ वर्षीय मुलाला बिबट्याने उचलून नेले. त्या मुलाचा अद्याप पत्ता लागला नसून वनविभागाकडून शोधकार्य सुरुच आहे.
विशेष म्हणजे याआधीही जंगली श्वापदांच्या घटना उघडकीस आल्या असून मानव-वन्यजीव संघर्ष गंभीर होत चालला आहे. २ वर्षापूर्वी केंद्रातील निवासस्थान परिसरात एका पाचवर्षीय मुलीला बिबट्याने उचलून नेल्याची घटना घडली होती. त्यानंतर २०२१ ला वाघाने हल्ला करून एका व्यक्तीला जखमी केले होते. तर, आता सलग दोन दिवसांत दोन जणांवर वन्य श्वापदांनी हल्ला करून उचलून नेले असून परिसरातील नागरिकांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण आहे.