उन्हाच्या दाहकतेने पिके करपली
By admin | Published: August 26, 2014 11:21 PM2014-08-26T23:21:09+5:302014-08-26T23:21:09+5:30
पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली. अधामधात कोसळलेल्या सरींवर पेरणी आटोपली. अंकुर जमिनीबाहेर आले. मात्र पावसाचा पत्ता नाही. आता तर उन्हाळ्यासारखे उन्ह तळपत असून
चंद्रपूर : पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली. अधामधात कोसळलेल्या सरींवर पेरणी आटोपली. अंकुर जमिनीबाहेर आले. मात्र पावसाचा पत्ता नाही. आता तर उन्हाळ्यासारखे उन्ह तळपत असून शेतातील पीके करपू लागली आहे. सोमवारी जिल्ह्यातील काही गावांत पावसाने हजेरी लावली. मात्र ती शेतकऱ्यांसाठी समाधानकारक नाही.
जिल्ह्यात असलेली परिस्थिती सर्व जिल्हाभर दिसत आहे. शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध आता फुटला आहे. पाण्याअभावी कपरणारी पिके पाहून शेतकऱ्यांना अश्रु आवरणे कठीण झाले आहे.
दुबार, तिबार पेरणीत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. पावसाची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासाच मिळाला नाही. दररोज उन्हाळ्यासारखे उन्ह पडत आहे. नदी- नाले कोरडे असून सिंचनाची सोय असलेले शेतकरी भारनियमनाने हतबल झाले आहे. अशा स्थितीत उडीद, मुंगाची पेरणीही झाली नाही.
साधातरण: पोळ्याच्या हंगामात उडीद- मुंगाचे पीक हाती येते. त्यावर पोळा साजरा केला जातो. परंतु यंदा त्याचीही सोय नाही. दुष्काळाचे स्पष्ट सावट ग्रामीण भागात दिसत आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पावसाची काळजी आहे. पाण्याअभावी करपणारे पीक पाहून शेतकऱ्याचा जीवाची घालमेल होत आहे.
यासोबतच पाऊस न आल्याने वैराणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. पोळ्याच्या महिन्यात सर्वत्र हिरवा चारा उपलब्ध असतो. परंतु यंदा तीही स्थिती नाही. जनावरांना काय खाऊ घालायचे असा प्रश्न उभा ठाकला आहे. अनेकांनी तर नाईलाजाने आपली जनावरे विक्रीस काढली आहे. शासनाने तालुक्याला टंचाईग्रस्त घोषित केले असले तरी त्याचा लाभ मात्र कितपत मिळतो हे महत्त्वाच आहे.
यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट आहे. मागील वर्षी अतिपावसामुळे पिकांची नासाडी झाली तर यावर्षी पाऊसच आला नसल्याने हातात पीक येण्याची चिन्ह नाही. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत देणे गरजेचे आहे. (नगर प्रतिनिधी)