शेतीचे पाणी सिमेंट कंपन्यांना

By admin | Published: March 6, 2017 12:32 AM2017-03-06T00:32:05+5:302017-03-06T00:32:05+5:30

आदिवासीबहुल क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यातील पकडीगुड्डम व अमलनाला तलावाची....

Cultivation of farming companies | शेतीचे पाणी सिमेंट कंपन्यांना

शेतीचे पाणी सिमेंट कंपन्यांना

Next

शेतकरी वंचित : तलावातील गाळ उपसा करण्याची मागणी
कोरपना : आदिवासीबहुल क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यातील पकडीगुड्डम व अमलनाला तलावाची निर्मिती होऊन ३० वर्षाचा कालावधी लोटला आहे. या तलावामुळे परिसरातील शेती ओलिताखाली येऊन हरितक्रांती होईल, अशी अपेक्षा होती. मात्र शेतीचे पाणी सिमेंट उद्योगाला दिले जात असल्याने शेतीला अद्यापही सिंचनाची प्रतीक्षा आहे.
कोरपना तालुक्यात दोन सिंचन प्रकल्प आहेत. या दोन्ही प्रकल्पाचे पाणी उद्योगासाठी सिमेंट कंपन्यांना प्राधान्याने उपलब्ध करून दिल्याने प्रस्तावित लाभक्षेत्रातील अंदाजे दोन हजार हेक्टर शेती क्षेत्र सिंचनापासून वंचित आहे. परिणामी या क्षेत्रात सिंचनाची व्यवस्था असूनही सिंचनाची समस्या कायम आहे. ही समस्या टाळण्यासाठी तलाव आणि बोड्यांमधील गाळाचा उपसा करून पाटचारीची कामे करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
गेल्या दहा-पंधरा वर्षापासून लघु वितरिका नासधूस झालेल्या आहेत. अनेक गावात पाटचारीची कामे झालेली नाही. त्यामुळे शिवार ओला होत नसल्याने सिंचन राहूनसुद्धा शिवार कोरडवाहू पिके घेत आहे. पकडीगुड्डमवरुन ३५ किमी अंतरावर असलेल्या अंबुजा सिमेंट कंपनीला पाईपलाईन द्वारे पाणी पुरवठा होतो.
गतवर्षी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा झाल्याने एप्रिल व मे महिन्यात १२ गावांची नळयोजना बंद पडली होती. जिवंत जलसाठ्यातून कंपनीसाठी पाणी आरक्षित असल्याने व २५.६८ टक्के पाण्याची उचल होत असल्याने ९४३ हेक्टर सिंचनाला फटका बसत आहे. तसेच रब्बी, खरीप हंगामात आजतागायत पाटबंधारे विभाग प्रस्तावित उद्दीष्ट साध्य करण्यास असमर्थ ठरत असून २५ टक्के गावांत पाणीच पोहचलेले नाही.
तसेच अमलनाला येथूल अल्ट्राटेक, माणिकगड या सिमेंट कंपन्यांसाठी १६.२० टक्के पाणी आरक्षित आहे. २०१५-१६ मध्ये अमलनाला प्रकल्पाचे सॅटेलाईट सर्वेनुसार १.६५ द.क्ष.मी. पाणी साठा गाळ साचल्यामुळे जलसाठ्यात घट झाली. ही गाळ काढण्यासाठी व पिपर्डा शिवारात पाटचारी ऐवजी पाईप डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम द्वारे प्रायोगिक तत्वावर सिंचनाची सोय उपलब्ध करण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
याची दखल व सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभागाला पालकमंत्र्यांना निर्देश दिले. विभागाकडून या विषयी हालचाली सुद्धा झाल्या आहेत. अनेक ठिकाणच्या गळतीमुळे कालव्याचे पाणी शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही. येथील मुख्य कालव्यांची दुरुस्ती, पकडीगुड्डम वितरिका, लघु वितरीकाची गरज असून या पूर्वी तीन कोटींचा निधी सांडव्यावर खर्च झाला. मात्र त्याचा काहीच उपयोग सिंचनासाठी झाला नाही. नव्याने पाच कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्यास या भागातील दहा ते पंधरा गावांना सिंचनाचा लाभ होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात असून याची प्रशासनाने दखल घेण्याची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)

उच्च पातळीचे बांध बांधल्यास शेतीला मिळेल पाणी
तालुक्याच्या उत्तरेस पैनगंगा नदी वाहते. मात्र यावर उच्च पातळीचे बांध नसल्याने पाणी वाहून जाते. नदीवर उद्योगासाठी कंपनीमार्फत बंधारा बांधल्यास चार त पाच किमी अंतरावरुन सिमेंट कंपन्यांना व शेतकऱ्यांनाही हक्काचे पाणी उपलब्ध होईल तसेच याचा लाभ कोरपना, राजूरा तालुक्यासह घुग्घुस आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील शेतीलासुद्धा होऊ शकतो.

Web Title: Cultivation of farming companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.