नाट्य स्पर्धेने सांस्कृतिक वैभव होते संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 11:47 PM2017-11-13T23:47:39+5:302017-11-13T23:47:53+5:30
मराठी रंगभूमी ही भारतातील श्रेष्ठ रंगभूमी आहे. हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेने ५७ वर्षांच्या प्रवासात अनेक श्रेष्ठ कलावंत, तंत्रज्ज्ञ मराठी रंगभूमीला दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मराठी रंगभूमी ही भारतातील श्रेष्ठ रंगभूमी आहे. हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेने ५७ वर्षांच्या प्रवासात अनेक श्रेष्ठ कलावंत, तंत्रज्ज्ञ मराठी रंगभूमीला दिले आहे. या स्पर्धेचे वैभव असेच उत्तरोत्तर बहरावे, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशिल आहे. स्पर्धा ही निकोप असावी व त्यामाध्यमातून राज्याचे सांस्कृतिक वैभव अधोरेखित व्हावे, अशी अपेक्षा चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर यांनी व्यक्त केली.
येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे आयोजित ५७ व्या हौशी मराठी राज्य नाटय स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा उद्घाटन सोहळा रविवारी पार पडला. या स्पर्धेचे उद्घाटन अंजली घोटेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे होते. प्रमुख अतिथी म्हणून हिराचंद बोरकुटे, परीक्षक डॉ. राजीव मोहोळकर, रमाकांत मुळे, प्रशांत गोखले, प्रदीप दाते यांची उपस्थिती होती. याप्रसंगी सचिन कलंत्रे यांनी स्पर्धेत सहभागी सघांना शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ नाटय कलावंत बोरकुटे यांनी आपल्या भाषणातून चंद्रपूरच्या रंगभूमीच्या इतिहासाबाबत संक्षिप्त माहिती देत नवी पिढी जोमाने रंगकर्म करीत हा वारसा पुढे नेत असल्याबाबत कौतुक केले. परीेक्षक रमाकांत मुळे यांनीही मनोगत व्यक्त केले.