पटावरील बंदी उठविल्याने संस्कृतीला मिळणार उजाळा

By admin | Published: January 11, 2016 01:04 AM2016-01-11T01:04:59+5:302016-01-11T01:04:59+5:30

मंडई, नाटक आणि शंकरपट या तीन गोष्टींना झाडीपट्टीत अनन्य साधारण महत्त्व आहे. यापैकी शंकरपटावर लादण्यात आलेली ...

Cultures will get light due to the curtailing of the leaf | पटावरील बंदी उठविल्याने संस्कृतीला मिळणार उजाळा

पटावरील बंदी उठविल्याने संस्कृतीला मिळणार उजाळा

Next

जुने वैभव पुन्हा येणार : झाडीपट्टीत उत्साहाला उधाण
घनश्याम नवघडे नागभीड
मंडई, नाटक आणि शंकरपट या तीन गोष्टींना झाडीपट्टीत अनन्य साधारण महत्त्व आहे. यापैकी शंकरपटावर लादण्यात आलेली बंदी केंद्र सरकारने नुकतीच उठविल्याने झाडीपट्टीत उत्साहाला उधान आले आहे. बंदी उठल्याने झाडीपट्टीचा हा उत्सव लवकरच सुरू होणार आहे.
झाडीपट्टीत प्रामुख्याने चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या चार जिल्ह्यांचा समावेश होतो. या चार जिल्ह्याचे प्रमुख आणि एकमेव पीक धान हेच आहे. या धान पीकाच्या हंगामाचा काळ जुलै ते डिसेंबर असा आहे. हा हंगाम झाल्यानंतर शेतकरी तसा मोकळाच असतो. या मोकळ्या वेळेत मनोरंजन म्हणून मंडई, नाटक आणि शंकरपटात तो आपला वेळ घालवण्यासाठी या प्रथा पडल्या असाव्यात, असे मत अनेकजण व्यक्त करीत असतात.
साधारणत: दिवाळीपासून नाटक आणि मंडईची रेलचेल सुरू होत असली तरी शंकरपटांचा आरंभ मात्र मकरसंक्रांतीपासून सुरू होतो आणि तो जून, जुलैपर्यंत सुरू असतो. दोन-तीन दशकांपूर्वी शंकरपट प्रत्येक गावात भरवले जायचे. शंकरपट भरविण्यामागे या निमित्ताने नातलगांच्या भेटीगाठी आणि उपवर वधू-वरांची पाहणी हे सुद्धा कारण सांगितले जाते. पण आता काळ बदलला आणि याचबरोबर त्याच्या व्याख्याही बदलल्या. तशा शंकरपटावरही मर्यादा आल्या. शंकरपटाची ‘दान’ ही गावाजवळ वाहत असल्याने बदलत्या नागरिकरणात या दानीवर अतिक्रमणे झाली. काही गावातील दानी जंगल कायद्याच्या कचाट्यात सापडल्या तर मनोरंजनाची दालणे आता मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्याने काहीसे शंकरपटाकडे दुर्लक्ष सुद्धा केले.
असे असले तरी शंकरपटाचे वेड काही कमी झाले नाही. याची प्रचिती नागभीड तालुक्यातील मसली, सावरगाव, गिरगाव, गोविंदपूर, वढोणा, सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी, रत्नापूर, शिवणी, ब्रह्मपुरी तालुक्यात हळदा, मुडझा, रान्होरी, दिघोरी, सावली तालुक्यातील मगरमेंढा या गावात अनेकांनी घेतली आहे. लोक अक्षरश: झपाटून जात असतात. मिळेल त्या वाहनाने आणि भेटेल त्या सवंगड्यासोबत जावून शंकरपटाचा आनंद घेत असत.
न्यायालयाच्या एका निर्णयानुसार मागील दोन वर्ष शंकरपटावर बंदी लादण्यात आली होती. त्यावेळी पटप्रेमी आणि ज्या गावात पटाचे आयोजन होते, त्या परिसरात चांगलीच खळबळ निर्माण झाली होती. म्हणूनच या निर्णयाविरोधात अनेकांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. एवढेच नाही तर शंकरपट हे महाराष्ट्राचे मनोरंजन कसे आहे हे सुद्धा केंद्र शासनाला पटवून देण्यात आले. सर्व खात्री झाल्यानंतरच केंद्र शासनाने शंकरपटावर लादण्यात आलेली बंदी उठविली.
केंद्र शासनाने शंकरपटावरील बंदी उठविल्यानंतर झाडीपट्टीत उत्साहाला उधान आले आहे. गेली दोन वर्ष शंकरपटावर बंदी असल्याने अनेकांनी आपले पटाचे बैल शेतीच्या कामात काढले होते. छकडे अडगळीत टाकले होते. पटाच्या दानीकडे दुर्लक्ष केले होते. या सर्वांना आता ‘अच्छे दिन’ येणार आहेत.

Web Title: Cultures will get light due to the curtailing of the leaf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.