जिज्ञासेतून घडताहेत बालवैज्ञानिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 10:27 PM2018-01-17T22:27:35+5:302018-01-17T22:29:33+5:30
‘बाळा तु लहान आहेस तुला हे कळणार नाही’ असे सहजपणे बोलणारे अनेक पालक आपल्या अवतीभोवती दिसतात.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : ‘बाळा तु लहान आहेस तुला हे कळणार नाही’ असे सहजपणे बोलणारे अनेक पालक आपल्या अवतीभोवती दिसतात. विज्ञान व तंत्रज्ञानाने दिलेल्या शोध-संशोधनातून निर्माण झालेल्या वस्तुंचा दैनंदिन वापर सुरू असतानाही त्यातील वैज्ञानिक दृष्टी समजून घेण्याची कुणी तसदी घेत नाहीत. परिणामी, सहजसाध्या शब्दांतून बालकांची वैज्ञानिकता संपवून टाकण्याची मानसिकता प्रबळ होताना दिसते. या चुकीच्या मनोवृत्तीने बालकांची वैज्ञानिक जिज्ञासा संपुष्ठात येते. खरे तर निसर्ग आणि समाजातील विविध घटनांच्या सहवासातून असंख्य प्रश्न विचारणाऱ्या बालकांना ‘गप्प बस ’ही धमकावणी थेट धोकादायक वळणावर घेऊन जाते. मात्र, विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला पाठिंबा देण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र आल्यास वैज्ञानिक होण्याची धडपड सुरू होते, हे भवानजीभाई चव्हाण हायस्कूलमधील जिल्हास्तरीय विज्ञान प्रदशर्नातून दिसून आले.
विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि स्वत:चे ज्ञान व निरीक्षणातून विविध प्रयोग सादर करता यावे, यासाठी जि. प. शिक्षण विभागाने स्थानिक भवानजीभाई विद्यालयात जिल्हा परिषद व खासगी शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शन भरविले. या प्रदर्शनात ग्रामीण व शहरी भागातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन विज्ञानिक प्रयोग सादर केले.
बाल मानसशास्त्रानुसार प्रत्येक विद्यार्थी म्हणजे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व. कुटुंब, शाळा आणि सामाजिक पर्यावरणातून बालकांची मनोभूमिका तयार होते. विद्यार्थ्यांच्या रोजच्या जगण्यात विज्ञानाचे अनेक संदर्भ येतात. लहान-लहान घटनांमध्ये विज्ञान दडले असून त्याचा कार्यकारणभाव समजावून सांगणाऱ्या पालक व शिक्षकांची आज खरी गरज आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचे संपूर्ण जीवन शेतीवरच आधारीत आहेत. त्यामुळे शिक्षणासोबतच शेती व मातीचा संबंध येणाऱ्या बालकांना विज्ञानाचे महत्त्व समजावून सांगितल्यास दृष्टिकोन बदलेल. विविध प्रश्न विचारून स्वत:च उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतील. यंदाच्या ४३ व्या विज्ञान प्रदर्शनात बहुतेक विद्यार्थ्यांनी शेती व पर्यावरणाशी निगडीत प्रयोग सादर केले. बदलेली शेती, पर्यावरणातील हानिकारक बदल, सेंद्रीय शेती, पाण्याची बचत, सूर्य आणि चंद्राचे महत्त्व, पाऊस कसा पडतो, यासाठी कारणीभूत घटक याची शास्त्रीय माहिती घेऊन प्रयोगांची मांडणी केली. शिक्षक व पालकांच्या बदलेल्या मानसिकतेचा हा परिणाम आहे.
सहज, साध्या वस्तुंचा वापर
राज्याच्या प्राथमिक व माध्यमिक शैक्षणिक धोरणांमध्ये वैज्ञानिक जाणिवेला अग्रस्थान दिले आहे. भारतीय संविधानानेही वैज्ञानिक मूल्यांचा पुरस्कार केला. मात्र, विद्यार्थ्यांच्या जाणिवा समृद्ध व्हावे, यासाठी शासनाकडून आर्थिक निधी आणि पायाभूत सुविधा देण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशा प्रतिकुल परिस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे शिक्षक विद्यार्थ्यांना वैज्ञानिक मूल्यांचे बिजारोपण करीत आहेत. विज्ञानातून माणूस घडतो. संकटांवर मात करण्याचे धैर्य विज्ञान देते. त्यामुळे परिसरात उपलब्ध वस्तुंचा वापर यंदाच्या जिल्हास्तरीय प्रदर्शनात केल्याचे दिसून आले.
वैज्ञानिकांचे स्मरण...
विज्ञानाचे विविध प्रयोग प्रयोगशाळेत होतात. मात्र, या प्रयोगांचे प्रेरणास्त्रोत मानवी जीवनात असते, अशी भूमिका डॉ. ए. पी. जे. अब्दूल कलाम यांनी मांडली होती. विज्ञान विषयाचे सुलभीकरण करून क्लिष्ट संकल्पना अतिशय सोप्या समजावून सांगणाºया डॉ. होमीभाभा यांच्यापासून तर जगभरातील प्रसिद्ध वैज्ञानिकांच्या कार्याची माहितीही गावखेड्यातील विद्यार्थी सहजपणे देताना दिसले. महाराष्ट्रातील शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, डॉ. वसंत गोवारीकर, डॉ. विजय भटकर यांच्या योगदानाची सविस्तर माहिती देऊन वैज्ञानिक होण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.
’लोकमत’ वर कौतुकाचा वर्षाव
ब्रम्हपुरी येथील ख्रिस्तानंद कनिष्ठ महाविद्यालयातील विक्रांत कुथे या विद्यार्थ्याने तयार केलेल्या ‘सोल्जरलेस गन’ या प्रतिकृतीवर ‘लोकमत’ ने बुधवारी शोधकथा प्रकाशित केली होती. विज्ञाननिष्ठेला चालना दिल्याने समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी ‘लोकमत’ वर कौतुकाचा वर्षाव केला. विशेष म्हणजे या प्रतिकृतीला परीक्षकांनी प्रथम पुरस्कार जाहीर करून राज्यस्तरीय निवड केली आहे.
बदलती शेती
कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल होत आहे. या बदलानुसार शेतकºयांनी आधुनिक शेती करावी, यासाठी सिंदेवाही तालुक्यातील सीताबाई माध्यमिक विद्यालयाच्या प्राची विठ्ठ गभणे या विद्यार्थिनीने प्रतिकृती सादर केली.
काष्ठ शिल्पातील विज्ञान
शेती अथवा वन परिसरात उपलब्ध असलेल्या विविध वृक्षाचा बुंधा आणि लाकडापासून जीवनोपयोगी वस्तु तयार करता येतात. पशुपक्षी आणि वन्यजीवसृष्टीच्या सहचरातून निसर्गाचे रक्षण करा, असा संदेश देणाºया काष्ठशिल्पाने उपस्थितांची मने आकर्षित केली होती.