काँग्रेसच्या उमेदवाराबाबत उत्सुकता शिगेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 10:12 PM2019-03-15T22:12:40+5:302019-03-15T22:13:10+5:30
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून काँग्रेस उमेदवाराबाबत मतदारांसह सर्वच राजकीय पक्षांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. शनिवारी काँग्रेसचे दिल्ली हायकमांड चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवाराबाबत निर्णय घेण्याची शक्यता सूत्राने वर्तविली आहे. याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून काँग्रेस उमेदवाराबाबत मतदारांसह सर्वच राजकीय पक्षांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. शनिवारी काँग्रेसचे दिल्ली हायकमांड चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवाराबाबत निर्णय घेण्याची शक्यता सूत्राने वर्तविली आहे. याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहेत.
२०१४ च्या निवडणुकीत तब्बल १८ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये भाजपा, काँग्रेस, बसपा या प्रमुख पक्षांसह आरपीआय, एसपी(आय), आरपी(खोरीप), आम आदमी पार्टी, लोकभारती, आ.पा. इंडिया, एसआयटीसी, बहुजन मुक्ती, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीसह सहा अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. ११ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी आतापर्यंत केवळ भाजप आणि वंचित बहुजन आघाडीचेच उमेदवार निश्चित झालेले आहे. उर्वरित एकाही पक्षाकडून कुणाचे नाव पुढे आले नाही. काँग्रेस हा या मतदार संघातील बलाढ्य पक्ष आहे. मात्र काँग्रेसच्या उमेदवारीचा तिढा थेट दिल्ली दरबारी गेला आहे. दिल्लीतही निर्णय व्हायला वेळ लागत असल्यामुळे कार्यकर्ते कुणाचा झेंडा हातात घ्यावा, या विवंचनेत आहे. १६ मार्च रोजी चंद्रपूर मतदार संघाबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, अशी अपेक्षा दिल्लीत गेल्या सोमवारपासून तळ ठोकून असलेली काँग्रेसची मंडळी सांगत आहे. मात्र याबाबतही ते साशंक आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या दिनांकापर्यंतही उमेदवारीचा निर्णय लांबला जाऊ शकतो, असा संशयही ते वर्तवित आहे. त्यामुळे तुर्तास काँग्रेसकडून एकाही नावावर स्थानिक पक्ष नेतृत्व ठाम नसल्याचे चित्र आहे. २०१४ च्या निवडणुकीत आम आदमी पार्टी तिसऱ्या क्रमांकावर होती. आपच्या उमेदवाराने तब्बल २ लाख ४ हजार मतांपर्यंत मजल मारली होती. आता निवडणूक काही दिवसांवर असतानाही आम आदमी पार्टीची निवडणुकीसाठी तयारी दिसत नाही. ४९ हजार मते घेऊन बसपा चौथ्या क्रमांकावर होती. या निवडणुकीत बसपाकडून अद्यापही हालचाली होताना दिसत नाही. वास्तविक, काँग्रेसचा उमेदवार जाहीर होत नाही, तोपर्यंत अन्य राजकीय पक्षांच्या तंबूत शांतताच राहतील, असे बोलले जात आहे. काँग्रेस उमेदवार जनतेपुढे आल्यानंतरच या निवडणुकीला रंग चढतील, असेही बोलले जात आहे.