लाठी-तोहोगाव क्षेत्रासाठी लालपरीचा अभिशाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:32 AM2021-09-12T04:32:37+5:302021-09-12T04:32:37+5:30
कोठारी : कोठारी, तोहोगाव, लाठी, सोनापूर (देश) या ४५ कि.मी.चा दुर्गम भागातील लालपरीचा प्रवास या भागातील नागरिकांना अत्यंत खडतर ...
कोठारी : कोठारी, तोहोगाव, लाठी, सोनापूर (देश) या ४५ कि.मी.चा दुर्गम भागातील लालपरीचा प्रवास या भागातील नागरिकांना अत्यंत खडतर ठरत असून आगारप्रमुखांच्या नियोजनशून्यतेमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या भागासाठी राजुरा आगाराची एकच बस फेरी सुरू असून शासकीय सुट्यांमध्ये तिचे शेड्युल रद्द करण्यात येत असल्याने प्रवाशांची तारांबळ उडत आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखले जाणारे तोहोगाव, लाठी, सोनापूर (देश) क्षेत्र अत्यंत मागासलेले आहे. अशातच परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या अवकृपेमुळे लालपरीचा प्रवासही थंडावलेला आहे. कोरोना परिस्थितीत प्रदीर्घ काळ टाळेबंदीमुळे प्रवास खुंटला. तो आजपर्यंत सुरळीत झालेला नाही. टाळेबंदीपूर्वी चंद्रपूर, लाठी, सोनापूरसाठी सकाळी १० वाजताची बससेवा विद्यार्थी व शासकीय कार्यालयीन कामकाज करणाऱ्या नागरिकांसाठी वरदान ठरली होती. ती बसफेरी बंद असून आज गरज असतानाही सुरू करण्यात आलेली नाही. राजुरा आगाराची चंद्रपूर-लाठी हाल्टिंग ही बससेवा सुरू असून ती दुपारी ३.३० वाजता चंद्रपूर स्थानकातून सुटत असून लाठी येथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.५०ला परतीच्या प्रवासाला निघते. मात्र, शासकीय सुट्यांमध्ये ही सुविधा आगारप्रमुखांच्या आदेशानुसार बंद असते.
बॉक्स
खासगी वाहनांकडून लूट
या मार्गावरील वाहतूक अत्यल्प असल्यामुळे आणि बससेवा खंडित असल्यामुळे बोटावर मोजता येतील, असेच प्रवासी वाहने या मार्गावर धावतात. बसभाडे कोठारी, तोहोगाव २५ रुपये, लाठीसाठी ४५ रुपये असताना खासगी प्रवासी वाहने कोठारी, तोहोगाव ५० रुपये व लाठी ९० रुपये याप्रमाणे पैसे घेतात. परिवहन महामंडळाच्या बस फेऱ्या बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पालकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.