यंदा खरीप हंगामावर वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 05:00 AM2020-04-29T05:00:00+5:302020-04-29T05:00:58+5:30

नोटाबंदीनंतर आलेली अतिवृष्टी, त्यानंतर अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडलेला शेतकरी आर्थिक घडी सावरत असतानाच आता कोरोनाच्या महामारीमुळे चांगलाचा अडचणीत सापडला आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामातही शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी रबी हंगामात पिकांची लागवड केली.

Curved look at the kharif season this year | यंदा खरीप हंगामावर वक्रदृष्टी

यंदा खरीप हंगामावर वक्रदृष्टी

Next
ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये वेळेवर बियाणे मिळणे कठीण : रोहणीचा पेराही लांबण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीमुळे यंदाचा खरीप हंगामही धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शेतीकामांना शासनाने लॉकडाऊनमधून सूट दिली आहे. शासनस्तरावर नियोजनही केले जात आहे. मात्र इतर जिल्ह्यात लॉकडाऊन पुन्हा वाढल्यास खरीप हंगाम या ना त्या कारणामुळे लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. २५ मेपासून सुरू होणाऱ्या खरीप हंगामाच्या धूळवाफ पेरण्याही लांबणार आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.
नोटाबंदीनंतर आलेली अतिवृष्टी, त्यानंतर अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडलेला शेतकरी आर्थिक घडी सावरत असतानाच आता कोरोनाच्या महामारीमुळे चांगलाचा अडचणीत सापडला आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामातही शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी रबी हंगामात पिकांची लागवड केली.
काहींनी उन्हाळी धानपीक घेतले. मात्र आधी कोरोनाचे संकट आणि त्यात अवकाळी पाऊस यामुळे आलेले पीकदेखील हातून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उन्हाळी भुईमूग, भाजीपाला, कलिंगड पिकांना ग्राहक नसल्याने शेतात सडून जात आहे. अनेक शेतकºयांवर ही पिके मोफत वाटण्याची वेळ आली आहे. जनावरांना घालावी लागत आहेत. सध्या शेतकरी वर्गात कोरोनाची धास्ती वाढली आहे.
यंदाचा खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २५ मेपासून खरीप हंगामातील भात पिकाच्या धूळवाफ पेरण्यांना सुरुवात केली जाते. तसेच पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी सोयाबीनची पेरणीही केली जाते. ही दोन्ही पिके चंद्रपूर जिल्ह्यात महत्त्वाची आहेत. तसेच त्यांना लागणारी खते आणि कीटकनाशकेदेखील गरजेची आहेत.

मुख्य डिलर रेड झोनमध्ये
बियाणांच्या विविध कंपन्यांचे मुख्य डिलर इतर जिल्ह्यात मोठया प्रमाणात आहेत. या जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रभाव वाढला आहे. अनेक जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे तेथून बियाण्याच्या गाडया सोडल्या जाणार काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यंदा शेतकऱ्यांनी पावसाची वाट न पाहता रोहिणी नक्षत्राचा मुहूर्त न पाहता गरज असलेल्या बियाणांची अगोदरच खरेदी करून सोशल डिस्टन्सिंग पाळत कामे करण्याची गरज आहे.

बियाण्यांबाबत अडचणी
पेरणीसाठी १५ एप्रिलदरम्यान भात, सोयाबीन पिकांच्या बियाणांसाठी विक्रेत्यांना कंपन्यांकडे आगाऊ नोंद करावी लागते, तशा नोंदी केल्या जात आहेत. शिल्लक बियाणे कंपन्या परत घेत नाहीत. त्यामुळे विक्रेते सध्या कोणत्याही प्रकारचा धोका स्वीकारायला तयार नाहीत. एप्रिलच्या शेवटच्या आठवडयापर्यंत बियाणे मुख्य डिलरकडून सबडिलरकडे येणे गरजेचे आहे; मात्र या सर्व प्रक्रिया कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनमुळे पूर्ण होण्याची शक्यता फारच कमी आहे.

सीमाबंदीमुळे अडचणी वाढणार काय?
बहुतांशी बियाणांच्या कंपन्या मध्यप्रदेश, इंदोर तसेच इतर राज्यात आहेत. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बियाण्यांची वाहतूक करण्यासाठी विशेष परवाना द्यावा लागणार आहे. तसेच अनेक शेतकरी सोयाबीन आणि कापूस पिकाचे बियाणे खरेदी करण्यासाठी चिमूर, शेगाव, हिंगणघाट येथे येत असतात. मात्र, आता राज्याच्या व जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्यामुळे शेतकºयांच्या अडचणीत भरच पडली आहे.

कोरोनामुळे सर्व उद्योग धंद्यांवर परिणाम झाला आहे. पण खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेती सेवा केंद्रांमध्ये वेळेवर बि-बियाणे, खते, कीटकनाशके या कृषी निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात.
- प्रशांत कोल्हे,
प्रगत शेतकरी, वाहानगाव, ता.चिमूर

Web Title: Curved look at the kharif season this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.