ग्राहकांनी संघटित होणे गरजेचे
By admin | Published: February 21, 2016 12:33 AM2016-02-21T00:33:42+5:302016-02-21T00:33:42+5:30
माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात आज मोठ्या प्रमाणात माहिती उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी या माहितीचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.
सुधीर मिसार : ग्राहक संरक्षण कायद्यावर जनजागृती
चंद्रपूर : माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात आज मोठ्या प्रमाणात माहिती उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी या माहितीचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थी वर्गाने स्वत: जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणे आणि एक आदर्श ग्राहक म्हणून या देशाला विश्वगुरु बनविण्यासाठी सर्व ग्राहकांनी संघटीत होणे ही आजची गरज असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुधीर मिसार यांनी केले.
सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर वाणिज्य विभागाद्वारे आयोजित ग्राहक संरक्षण कायदा व जनजागृती याविषयावर आयोजित मार्गदर्शन या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर.पी. इंगोले, वाणिज्य विभागाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. के.बी. मोहरीर, मुख्य मार्गदर्शन तथा अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुधीर मिसार आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना सुधीर मिसार यांनी विद्यार्थ्यांना ग्राहक म्हणून विविध पातळीवर होणारी फसवणूक एम.आर. पी. अन्नसुरक्षा कायदा स्वत: औषध, आरोग्य शिक्षणाचा मुलभूत अधिकार, माहितीचा अधिकार अशा विविध विषयांवर विविध आरक्षणांसह सविस्तर मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य तथा वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. आर.पी. इंगोले यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी भूमिका स्पष्ट करताना वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांना ग्राहक संरक्षण कायद्याची उपयुक्तता, गरज आणि आजच्या आधुनिक काळात विद्यार्थ्यांना या विषयाचे महत्त्व कळावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले. (शहर प्रतिनिधी)