सोशल मीडियावर सायबर सेलचा ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 01:02 AM2019-09-23T01:02:43+5:302019-09-23T01:05:44+5:30

युवकांनी आपले करिअर धोक्यात न घालता कोणत्याही वादग्रस्त पोस्ट पाठवणे, तयार करणे यापासून अलिप्त राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम व इतर सोशल साईटवर निवडणूक काळात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणे बेकायदेशीर आहे.

Cyber Cell 'Watch' on Social Media | सोशल मीडियावर सायबर सेलचा ‘वॉच’

सोशल मीडियावर सायबर सेलचा ‘वॉच’

Next
ठळक मुद्देनिवडणुकीसाठी प्रशासन लागले कामाला : आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून चंद्रपूर जिल्ह्यात निवडणूक काळात सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर व्हावा. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये. यादृष्टीने सोशल मीडियावर पोस्ट होणाऱ्या मजकुरावर पोलीस विभागाचा सायबर सेल करडी नजर ठेवून आहे. म्हणून जिल्ह्यातील युवकांनी स्वत:चे करिअर सांभाळावे. सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर करावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
युवकांनी आपले करिअर धोक्यात न घालता कोणत्याही वादग्रस्त पोस्ट पाठवणे, तयार करणे यापासून अलिप्त राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम व इतर सोशल साईटवर निवडणूक काळात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणे बेकायदेशीर आहे. नागरिकांनी अशा पोस्ट व्हायरल अथवा शेअर करू नये. अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल. युवकांनी निवडणुकीच्या काळात अशा पोस्ट पाठवणे. फॉरवर्ड करणे. त्यावर प्रतिक्रिया देणे टाळावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाने केले आहे. निवडणुकीच्या काळात सोशल मीडियाचा गैरवापर केल्याचे सिद्ध झाल्यास जबर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
स्मार्टफोनच्या माध्यमातून प्रत्येक जण सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे. दिवसभरात फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम व इतर सोशल साईटवर असंख्य संदेश प्राप्त होत असतात. अनेक वेळा हे संदेश न वाचता व खातरजमा न करता फॉरवर्ड केले जातात. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे आपल्याला येणारे मेसेज काळजीपूर्वक वाचून खातरजमा करूनच पुढे पाठवावे. कुठल्याही व्यक्तीची, समाजाची, महिलांची, राजकीय व्यक्तींची प्रतिमा मलिन करणारे मेसेज फॉरवर्ड करू नये, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या नेतृत्वात काम करत असलेल्या माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीने केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या काळात काही व्हॉट्सअप अकाऊंट गेल्या निवडणुकीप्रमाणे देखरेखीखाली घेण्याचे निर्देश दिले आहे. बेनामी संघटना, समाजकंटक व असामाजिक तत्त्व अशा काळात आपल्या व्हॉट्सअपचा गैरवापर करणार नाही. याबाबतही दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.विधानसभेची निवडणूक असल्यामुळे सोशल मीडियावर पोलीस विभागाच्या सायबर सेलची करडी नजर आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडिया हाताळताना अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. आपल्या हातून चुकीचा मेसेज जाऊ नये, याबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे. सध्या फेसबुक व व्हॉट्सअप वर विविध राजकीय प्रचाराच्या पोस्ट मोठया प्रमाणात पाठवल्या जात आहे. या मजकुराला सायबर सेल मॉनिटरिंग करीत आहे. ही बाब पोस्ट टाकणाऱ्यांनी लक्षात ठेवावी. कोणाचाही अनादर होणार नाही. जातीय तेढ वाढणार नाही. महिलांची बदनामी होणार नाही. ही काळजी घेण्याची जबाबदारी मजकूर टाकणाऱ्याची व शेयर करणाऱ्याची असणार आहे, असे निवडणून विभागाने स्पष्ट केले आहे.

चंद्रपुरात सर्वाधिक तर ब्रह्मपुरी विधानसभेत कमी मतदार
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली असून सर्वत्र निवडणुकीची वारे वाहू लागले आहे. जिल्ह्यातील सहा मतदार संघापैकी सर्वाधिक मतदार चंद्रपूर विधानसभेत असून सर्वात कमी मतदार ब्रह्मपुरी विधानसभेमध्ये आहे. जिल्ह्यात सहा मतदार संघ आहे. यामध्ये राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, चिमूर, वरोरा मतदार संघाचा समावेश आहे. १८ लाख ७२ हजार ८७८ मतदारांना सहा आमदार निवडणून द्यायचे आहे. यामध्ये चंद्रपूर विधानसभा क्षेत्रामध्ये २ लाख २ हजार २ ४७ पुरुष, १ लाख ९२ हजार ४५३ महिला, इतर १७ असे एकूण ३ लाख ९४ हजार ७१७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. राजुरा मतदार संघामध्ये १ लाख ६४९२८ पुरुष, १ लाख ५० हजार ३७३ महिला असे एकूण ३ लाख १५ हजार ३०१ मतदार, बल्लारपूर १ लाख ६३ हजार ६८४ पुरुष, १ लाख ५६ हजार २७१ महिला, इतर एक असे ३ लाख १९ हजार ९५६, चिमूरमध्ये १ लाख ४० हजार ६२५ पुरुष, १ लाख ३६ हजार ४९५ महिला, इतर दोन असे एकूण २ लाख ७७ हजार १२२ मदतार, वरोरामध्ये १ लाख ५३ हजार ३१३ पुरुष, १ लाख ४२ हजार ५६९ महिला, इतर दोन असे एकूण २ लाख ९५ हजार ८८४ मतदार आहे. तर ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रामध्ये या सर्वांत कमी मतदार असून १ लाख ३६ हजार ३० पुरुष तर १ लाख ३३ हजार ७७७ महिला असे एकूण २ लाख ६९ हजार ८०७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.
सर्व निवडणूक अधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक
निवडणूक प्रक्रिया सुव्यवस्थित पार पाडावी, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यातील सर्व मतदार संघातील अधिकाऱ्यांना (आरओ आणि एआरओ) सूचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आरओ आणि एआरओ यांना सूचना देताना जिल्हाधिकारी यांनी सांगितले की आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. २७ सप्टेंबरला अधिसूचना काढून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया स्पष्ट करावी. उमेदवारी अर्ज भरण्यापासून तर अर्ज माघार घेण्यापर्यंत काटेकोर नियमाचे पालन करून ही प्रक्रिया पूर्ण करावी. उमेदवारांना अर्ज भरताना तसेच जिल्हा प्रशासनाला कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी स्पष्ट सूचना देण्यात याव्यात. तसेच या सूचनेचे कटाक्षाने पालन करणे गरजेचे आहे. या प्रक्रियेमध्ये आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही. तसेच कोणतीही आक्षेपार्ह कृती होणार नाही. याकडेसुद्धा लक्ष द्यावे व प्रक्रिया पार पाडताना सुरक्षा काटेकोर असावी, अशा सूचना यावेळी संबंधित निवडणूक अधिकाºयांना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.

धार्मिक तेढ निर्माण करणारे संगीत नको
समाजामध्ये धर्माविषयी द्वेष पसरवण्याचा दृष्टीकोनातून काही समाजकंटकाद्वारे व्हॉट्सअप व यूट्यूबच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करणारे संगीत वाजवले जात असून यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी पोलीस विभागाला दिले आहे. समाजात तेढ निर्माण होऊ नये, याकरिता कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात अशा प्रकारचे गीत किंवा संगीत वाजवणाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच डीजे ऑपरेटरकडून असे आक्षेपार्ह संगीत न वाजवण्याचे वचन पत्र लिहून घ्यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहे..

Web Title: Cyber Cell 'Watch' on Social Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.