बापरे ! पिकांच्या रखवालीसाठी रात्रभर रावट्यावर जागरण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2022 05:00 AM2022-02-25T05:00:00+5:302022-02-25T05:00:22+5:30
पळसगाव वन परिसरातील विहीरगाव, पिपर्डा, मदनापूर, करबडा, गोंडमोहाळी, वाघेडांतर्गत वनविभागाचे जंगल आहे. त्याच परिसरात मोठे तलाव असल्याने वन विभागाच्या जंगलातील वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी रात्रीच्या वेळी तलाव व बोडीवर येतात. त्यामुळे वन विभागाच्या जंगलाला लागून असलेल्या शेतकऱ्यांमध्ये आपल्या शेतात रावट्या तयार करून रात्रभर जागरण करावे लागत आहे.
विकास खोब्रागडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पळसगाव (पिपर्डा) : चिमूर तालुक्यातील ताडोबाच्या बफर झोनअंतर्गत येणाऱ्या अतिदुर्गम भागात असलेल्या पळसगाव व परिसरातील गावात ताडोबाच्या वन विभागाच्या जंगलाला लागून असलेल्या शेतकऱ्यांना पिके राखण्यासाठी शेतात रावट्या टाकून रात्रभर जागरण करावे लागत आहे.
पळसगाव वन परिसरातील विहीरगाव, पिपर्डा, मदनापूर, करबडा, गोंडमोहाळी, वाघेडांतर्गत वनविभागाचे जंगल आहे. त्याच परिसरात मोठे तलाव असल्याने वन विभागाच्या जंगलातील वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी रात्रीच्या वेळी तलाव व बोडीवर येतात. त्यामुळे वन विभागाच्या जंगलाला लागून असलेल्या शेतकऱ्यांमध्ये आपल्या शेतात रावट्या तयार करून रात्रभर जागरण करावे लागत आहे. सध्या शेतात हरभरा, गहू, उन्हाळी धान पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. वन्य प्राण्यामुळे नुकसान होत आहे. त्यामुळे त्यापासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी धावपळ सुरू केली असून शेतकऱ्यांनी शेतात रावट्या उभारल्या आहेत. रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांची भीती असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले. त्यामुळे शेतकऱ्यांवर चौफेर संकट निर्माण झाले. जीव धोक्यात घालून शेतकरी पिकांची रखवाली करताना दिसत आहेत. यापूर्वी या परिसरात वन्यप्राण्यांनी जनावरांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यात जनावरे दगावलीही आहेत. मात्र, पिकांवरच उदरनिर्वाह असल्याने जीव धोक्यात घालून शेतकरी पीक राखत आहेत.
नुकसान भरपाईत वाढ करण्याची गरज
वन्य प्राण्यांकडून जनावरावर हल्ले झाले आहेत. पशुपालकांची जनावरे दगावली आहेत. त्यांना वन विभागाकडून नुकसान भरपाई मिळते. मात्र, त्यात वाढ होणे महत्त्वाचे आहे. तोकडी मदत मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे, प्रशासनाने या सर्वांची दखल घेऊन नुकसान भरपाईमध्ये वाढ करण्याची मागणी होत आहे.