बापरे ! २४३ कोटींच्या बांधकामात मुरमाऐवजी चक्क काळ्या मातीचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2022 05:00 AM2022-05-30T05:00:00+5:302022-05-30T05:00:44+5:30
राजुरा विधानसभा क्षेत्रातील कोरपना व राजुरा तालुक्यातील राज्य मार्गाचे विभाजन करून महामार्गात रूपांतर करण्यात आले. यात वनसडी-कवठाळा-पोवनी हा १४८ क्रमांकाचा ३१ किमीचा तर शिवनी-हडस्ती-कढोली-पोवनी-गोवरी-राजुरा हा ३७२ क्रमांकाचा ३६ किमीचा महामार्ग निर्माण करून या महामार्गाच्या बांधकामांकरिता शासनाने २४३ कोटींच्या निधीची तरतूद केली. त्यानुसार बांधकामही सुरू झाले.
नितीन मुसळे
लोकमत न्यूज नेटवर्क
सास्ती : राजुरा तालुक्यातील वेकोली परिसरातून जाणाऱ्या राज्य मार्गाचे विभाजन करून महामार्गात रूपांतर करण्यात आले. कोट्यवधी रुपये खर्च करून सुरू असलेल्या महामार्गाच्या बांधकामात मुरुमाऐवजी शेतातील काळ्या मातीचा वापर होत असल्याने वाहतुकीस धोका निर्माण होणार आहे. या महामार्गाच्या बांधकामावर लोकप्रतिनिधी, शासन व प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्रातील कोरपना व राजुरा तालुक्यातील राज्य मार्गाचे विभाजन करून महामार्गात रूपांतर करण्यात आले. यात वनसडी-कवठाळा-पोवनी हा १४८ क्रमांकाचा ३१ किमीचा तर शिवनी-हडस्ती-कढोली-पोवनी-गोवरी-राजुरा हा ३७२ क्रमांकाचा ३६ किमीचा महामार्ग निर्माण करून या महामार्गाच्या बांधकामांकरिता शासनाने २४३ कोटींच्या निधीची तरतूद केली. त्यानुसार बांधकामही सुरू झाले. परंतु मागील दोन वर्षांपासून या रस्त्याचे बांधकाम संथगतीने सुरू होते. काही दिवसांपूर्वीपासून कामात गती आली. परंतु बांधकामाच्या दर्जाकडे मात्र कमालीचे दुर्लक्ष केले जात असून याकडे शासन, प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.
रस्ता बांधकामात पूर्वी वेकोलीच्या खोदकामातून निघणाऱ्या मातीचा वापर करण्यात आला. रस्ता बांधकामानंतर अनेक ठिकाणी उखडलेला दिसून येत आहे. रस्ता बांधकामानंतर रस्त्याच्या कडेला मुरूम टाकण्यात येतो. परंतु या महामार्गाच्या बांधकामात मात्र रस्त्याच्या कडेला शेतातील काळ्या मातीचा वापर केला जात आहे. या महामार्गाच्या गोवरी गावाजवळ तसेच माथरा गावाजवळ रस्त्याच्या कडेलाच नाली खोदून शेतातील काळी माती टाकली जात आहे. पावसाळा तोंडावर असताना ही काळी माती टाकल्यामुळे रस्त्याच्या कडेला चिखल होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. तर ही काळी माती पावसाच्या पाण्याने वाहून रस्त्यावर आल्याने दुचाकीस्वारांनाही कमालीची कसरत करावी लागेल.
बांधकामात त्रास; बांधकामानंतरही यातनाच
मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या रस्ता बांधकामामुळे परिसरातील जनता त्रस्त होतीच. परंतु बांधकाम झाल्यानंतरही त्यांच्या नरकयातना सुरूच राहणार आहेत. याकडे शासन व प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने आता संताप व्यक्त केला जात आहे.
रस्त्याच्या कडेला मुरूम टाकणे गरजेचे असताना त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातील काळी माती टाकल्याने चिखल निर्माण होऊन मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- भास्कर जुनघरी, सामाजिक कार्यकर्ता, गोवरी