चंद्रपूरची दीक्षाभूमी झाली पावन
By Admin | Published: October 17, 2016 12:42 AM2016-10-17T00:42:14+5:302016-10-17T00:42:14+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.
रामदास आठवले : ६० वा धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा
चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेबांनी १६ आॅक्टोबर १९५६ रोजी चंद्रपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शामुळे चंद्रपूरची दीक्षाभूमी पावन झाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी रविवारी येथे केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीतर्फे ६० वा धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा येथील दीक्षाभूमीवर आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ना. आठवले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर होते. प्रमुख अतिथी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आ. नाना शामकुळे, मनपा महापौर राखी कंचर्लावार, अल्पसंख्यांक विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, ‘सिरि गौतम बुद्ध’ चित्रपटाचे अभिनेते गगन मलिक व अभिनेत्री अंशू मलिक, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवान आदी उपस्थित होते.
यावेळी ना. आठवले म्हणाले की, आम्ही क्रांतीच्या मार्गाने मार्गक्रमण करीत शांतीच्या मार्गाकडे निघालो आहोत. बुद्धाचा शांतीचा मार्ग जगात शांतता निर्माण करू शकतो. बुद्धाच्या या मार्गाचे अनुसरण केले पाहिजे. आजचा दिवस बुद्धाच्या शांतीच्या मार्गाचे स्मरण करण्याचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामध्ये बुद्धाचा मार्ग पुन्हा रूजविला आहे. या मार्गावरून आम्ही कधीही ढळणार नाही. चंद्रपूरच्या भूमीलादेखील बुद्धाच्या मार्गाचा लाभ झाला आहे. त्याचे अनुसरण सर्वांनी करावे, असे आवाहन आठवले यांनी यावेळी केले. तत्पूर्वी प्रास्ताविक अशोक घोटेकर यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, उपाध्यक्ष मारोतराव खोब्रागडे, सचिव वामनराव मोडक, सदस्य कुणाल घोटेकर, डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश दहेगांवकर, प्रा. सतीश पेटकर, डॉ. डी.एस. रामटेके, डॉ. मिलिंद भगत आदींनी केले.
कार्यक्रमाला अमेरिकेचे भदन्त होझान अलन सेनाडके, प्रा. डॉ. नंदवर्धनबोधी, रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, माजी आमदार अनिल गोंडाणे, नागपूरचे अध्यक्ष राजन वाघमारे, चंद्रपूरचे रिपाइं नेते राजू भगत, जयप्रकाश कांबळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पाहुण्यांनी घेतले अस्थिकलशाचे दर्शन
दीक्षाभूमी येथील बुद्ध विहारात तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. दीक्षाभूमीवर पाहुण्यांचे आगमन झाल्यावर ते थेट बुद्ध विहारात गेले. तेथे त्यांनी तथागत बुद्धाच्या मूर्तीपुढे नतमस्तक होऊन अस्थिकलशाचे दर्शन घेतले. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आधी बुद्ध विहारात प्रवेश घेतला.
मोदी असेपर्यंत चिंता नाही
यावेळी ना. आठवले यांनी बरीच फटकेबाजी केली. चंद्रपूर येथील दीक्षाभूमी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे कामकाज आधी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे कुटुंबाकडे होते. आता ते घोटेकर कुटुंबाच्या ताब्यात असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रामध्ये नरेंद्र मोदी सरकार असेपर्यंत आपल्याला घाबरण्याचे काही कारण नसल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले.