धरण आटले, पाणी पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 11:18 PM2018-05-14T23:18:20+5:302018-05-14T23:18:43+5:30

गतवर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे यावर्षी अनेक ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या उन्हाचा पारा ४७ अंशावर पोहोचला असून नदी, नाले कोरडे पडत आहेत. यातच जिल्ह्यातील चार जलाशये पूर्णत: कोरडे पडले असून पाणी समस्या बिकट झाली आहे. पाण्यासाठी अनेक गावात हाहाकार सुरू असून नदी, नाले, जलाशये आटल्याने अनेक गावांची पाणीपुरवठा व्यवस्थाच कोलमडली आहे.

The dam washed and water washed | धरण आटले, पाणी पेटले

धरण आटले, पाणी पेटले

Next
ठळक मुद्देचार जलाशये कोरडी : अनेक गावांची पाणी पुरवठा व्यवस्था कोलमडली

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गतवर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे यावर्षी अनेक ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या उन्हाचा पारा ४७ अंशावर पोहोचला असून नदी, नाले कोरडे पडत आहेत. यातच जिल्ह्यातील चार जलाशये पूर्णत: कोरडे पडले असून पाणी समस्या बिकट झाली आहे. पाण्यासाठी अनेक गावात हाहाकार सुरू असून नदी, नाले, जलाशये आटल्याने अनेक गावांची पाणीपुरवठा व्यवस्थाच कोलमडली आहे.
जिल्ह्यातील १० धरणांपैकी चार धरण हे पूर्णत: कोरडे पडले आहेत. यात नलेश्वर, चंदई, चारगाव, लभानसराड या धरणांचा समावेश आहे. या धरणात संकल्पीत उपयुक्त पाणीसाठ्या व्यतीरिक्त आता एकही पाणीसाठा उपलब्ध नाही. तर असोलामेंढा, घोडाझरी, चारगाव, अमलनाला, पकडीगुड्डम, डोंगरगाव, इरई या धरणातही सध्या अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे हे धरणेसुद्धा काही दिवसांत कोरडे पडण्याची शक्यता आहे.
सध्या सूर्य आग ओकत आहे. जिल्ह्याचे तापमान ४७ अंशाच्या पार गेले असून या तीव्र उन्हामुळे घसा कोरडा पडून पाण्याची सतत गरज भासत आहे. मात्र पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणा ज्या ठिकाणी कार्यरत आहेत, त्या ठिकाणी पाणीच वाहत नसल्याने या यंत्रणाही निकामी ठरल्या आहेत.
धरणातील पाणीसाठा लगतच्या गावातील नागरिकांसाठी व जनावरांसाठी उपयोगी येत होते. तर काही गावातील पाणी पुरवठा योजनाही धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र धरणच कोरडे पडल्याने या पाणी पुरवठा योजना आता कुचकामी पडल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ११४२ एवढे आहे. मात्र गतवर्षी सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत कमी पर्जन्यमान झाल्याने यावर्षी पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे.
अनेक गावात पाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू असून प्रशासनाने काही गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे. तर काही गावात अद्यापही टँकर पोहोचले नसल्याने गावकºयांत रोष पसरला आहे.
ग्रामीण भागात पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष
गतवर्षी पावसाळ्यात अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे जलाशये, नदी, तलाव-बोड्या पुर्णपणे भरल्या नाही. आता तर तप्त उन्हामुळे पाण्याचे स्रोत आटत चालले आहे. ग्रामीण भागातील अनेक बोअरवेल्स बंद आहेत. विहिरी आटल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. कोरपना, जिवती तालुक्यात तर पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. असे असले तरी प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना अद्याप करण्यात आलेल्या नाही.
धरणातील उपलब्ध पाणीसाठा
७ मेच्या नोंदीनुसार सध्यास्थितीत आसोलामेंढा धरणात १४.२५ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. घोडाझरी तलावात २४.९६ टक्के, अमलनाला धरणात १३.४० टक्के, पकडीगुड्डम धरणात ९.७० टक्के, डोंगरगाव धरणात १७.७२ टक्के तर इरई धरणात केवळ १५.५० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. लभानसराड धरण कोरडे पडले असून नलेश्वर धरणात १.२० टक्के तर चारगाव धरणात ६.६८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

Web Title: The dam washed and water washed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.