आर्यन कॉल वाशरीच्या ट्रान्सपोर्टमुळे कोरोनाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:30 AM2021-04-09T04:30:32+5:302021-04-09T04:30:32+5:30
परप्रांतातील १५० ते २०० ट्रक येतात रोज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुविधांचा अभाव सास्ती : राजुरा तालुक्यातील पांढरपोवनी गावाजवळ ...
परप्रांतातील १५० ते २०० ट्रक येतात रोज
: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुविधांचा अभाव
सास्ती : राजुरा तालुक्यातील पांढरपोवनी गावाजवळ असलेल्या आर्यन कोल वाॅशरीज्मध्ये दररोज १५० ते २०० ट्रक परप्रांतातून कंपनीत येत असल्याने येथे काम करणारे कामगार व लगतच्या पांढरपोवनी गावाला कोरोनाचा मोठा धोका निर्माण झाला असून यावर आळा घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यावर निर्बंध घालण्यासाठी जिल्हा प्रशासन नानाविध योजना आखत आहे. परंतु राजुरा तालुक्यातील आर्यन कोल वाॅशरीज्मध्ये या निर्बंधाचा फज्जा उडवला जात आहे.
आर्यन कोल वाॅशरीजमध्ये दररोज दीडशे ते दोनशे ट्रक आंध्र प्रदेश व इतर राज्यातून येतात. सर्व ट्रक ड्रायव्हर सामाजिक अंतर न ठेवता एकत्रित वावरताना दिसतात.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. ड्रायव्हर लगतच्या पांढरपोवनी गावात येऊन मुक्काम थाटतात तर विविध दुकानांत खरेदीसाठी येतात. यामुळे या कंपनीत काम करणाऱ्या गावातील कामगारांना आणि या कामगारांमुळे आणि ड्रायव्हरमुळे गावातील नागरिकांनासुद्धा कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. अशा स्थितीत कंपनी प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केलेली दिसत नाही.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता सदर ट्रान्सपोर्ट बंद करण्यात येऊन कंपनीतील कामगारांच्या आरोग्याच्या हेतूने सुविधा पुरविण्यात याव्यात, अशी मागणी पांढरपोवनीवासीयांतर्फे संदीप गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली असून, निवेदनाच्या प्रति राज्याचे आरोग्यमंत्री, पालकमंत्री यांना जिल्हाधिकारी, पोलीस विभागाला तहसीलदार यांच्यामार्फत पाठविल्या आहेत.