चंद्रपुरातील 30 टक्के घरात आढळली डेंजर डासांची अंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2022 05:00 AM2022-06-24T05:00:00+5:302022-06-24T05:00:10+5:30
मनपा आरोग्य विभागामार्फत एमपीडब्लू, एनएम व आशा वर्करद्वारा डासअळी उगमस्थाने शोधून नष्ट करण्यासाठी कंटेनर सर्वेक्षण राबविला जात आहे. सर्वेक्षणअंतर्गत आतापर्यंत १० हजार ८८५ घरांची तपासणी करण्यात आली. यात ३० टक्के घरांत डासांची अंडी आढळली आहेत. हे प्रमाण मोठे असल्याने सर्वांनीच सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. डेंग्यूचा डास हा स्वच्छ व साचलेल्या पाण्यात आढळतो. त्यामुळे आपल्या घराची तपासणी करा. कूलर, टायर, भंगारातील वस्तू, डबे यात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : डेंग्यू व इतर कीटकजन्य आजारांचा उद्रेक टाळण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत घरोघरी केल्या जाणाऱ्या कंटेनर सर्वेक्षणात ३० टक्के घरांमध्ये डासांची अंडी आढळली आहेत. आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. डेंग्यू व इतर कीटकजन्य आजार पसरू नयेत, या दृष्टीने मनपा प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. मात्र, नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मनपा आरोग्य विभागामार्फत एमपीडब्लू, एनएम व आशा वर्करद्वारा डासअळी उगमस्थाने शोधून नष्ट करण्यासाठी कंटेनर सर्वेक्षण राबविला जात आहे. सर्वेक्षणअंतर्गत आतापर्यंत १० हजार ८८५ घरांची तपासणी करण्यात आली. यात ३० टक्के घरांत डासांची अंडी आढळली आहेत. हे प्रमाण मोठे असल्याने सर्वांनीच सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. डेंग्यूचा डास हा स्वच्छ व साचलेल्या पाण्यात आढळतो. त्यामुळे आपल्या घराची तपासणी करा. कूलर, टायर, भंगारातील वस्तू, डबे यात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्या. पाणी साठवण्याची भांडी कोरडी करा, डासअळी आढळल्यास अबेट द्रावण टाका. पाणी साठा मोठा असले, तर त्यात गप्पी मासे टाका. गप्पी मासे पाण्यातील डासांची अंडी खाऊन टाकतात, ज्याने डासांचा प्रादुर्भाव कमी होतो.
डेंग्यू हा जीवघेणा आजार असल्याचे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे डासवाढीला प्रतिबंध हाच सर्वात उत्तम उपाय आहे. काळजी घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेने केले.
आजार अंगावर काढू नका
- शिळे किंवा उघड्यावरचे माश्या बसलेले अन्न पदार्थ खाऊ नयेत, अन्न पदार्थ व्यवस्थित झाकून ठेवावेत.
- हातगाड्यावर, उघड्यावर विकले जाणारे खाद्य पदार्थ खाऊ नयेत.
- पावसाळ्यात आजा अंगावर काढू नका, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
शुद्ध न केलेले पाणी वापरू नका
मनपाच्या नळावाटे होणार्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा. बोअरवेल, कॅनॉल, शुद्धीकरण न केलेल्या विहिरीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करू नये. शाळा, महाविद्यालयांना पुरविण्यात येणारे टाकी, पंपवेलची सफाई करावी. प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करावे. उलट्या-जुलाब, विषमज्वर वगैरे विकार झाल्यास वेळीच उपचार घ्यावा.